संपूर्ण राज्यातच नाही तर देशभरात चर्चेत राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या निवडणुकीमध्ये महायुतीने बाजी मारली आहे. नव्या कार्यकारिणीची नियुक्ती झाल्यानंतर पहिल्याच बैठकीमध्ये गोकुळच्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठा धक्का देणारा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोकुळकडून कोणता निर्णय घेतला जाण्याची शक्यता?
गुजरातमधील 'अमूल'ने दूध विक्री दरात प्रती लिटर 2 रुपयांची वाढ केल्यानंतर आता गोकुळकडूनही दूध विक्री दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. उद्या गोकुळची नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत दूध विक्री दरात वाढ करण्याबाबत प्राधान्याने चर्चा होणार आहे. सध्या दुधाचा तुटवडा सुरू असून दूध उत्पादन खर्च वाढला आहे. या पार्श्वभूमीवर 'अमूल'ने 2 ते 4 रुपयांपर्यंत विक्री दर वाढवले आहेत. गोकुळनेही याबाबतच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
रोज गोकुळचं किती दूध विकलं जातं?
सध्या गोकुळची 14 लाख लिटरपर्यंत दैनंदिन विक्री आहे. विशेषतः मुंबई आणि पुण्यामध्ये गोकुळ दुधाची सर्वाधिक विक्री होते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुधाचे उत्पादन कमी झालं आहे. त्या तुलनेत पशुखाद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे गोकुळ दूध संघानेही विक्री दरात वाढ करण्यासाठी पावले उचलली आहेत. सध्या गोकुळचे दूध हे मुंबईत प्रतिलिटर 78 रुपयांनी विक्री होते. दुधाचे उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांना देखील दर वाढवून देण्याची शक्यता आहे.
किती असू शकतो नवा दर?
सध्या व्यक्त केल्या जात असलेल्या शक्यतेनुसार, गोकुळचे दर प्रतिलिटर 2 ते 4 रुपयांनी वाढले तरी मुंबईतील दर 82 रुपये लिटरपर्यंत जातील. म्हणजेच दर महिन्याचं दुधाचं बजेट जवळपास 120 ते 150 रुपयांनी वाढू शकते.
दोन महत्त्वाच्या ब्रँडने वाढवले दर
'अमूल'बरोबरच 'मदर डेअरी'ने सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 ते 4 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. यादरवाढीमुळे दिल्ली-एनसीआर आणि इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये फुल क्रीम दुधाचा दर ₹72 वरून ₹76 प्रतिलिटर झाला आहे. 'अमूल'च्या दुधाचा दरवाढीनंतरचे दर प्रतिलिटर 62 ते 86 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अमूल ताजा (टोन्ड मिल्क) 62 रुपये प्रतिलिटर इतकं झालं आहे. तर अमूल गोल्ड (फुल क्रीम) दुधाचा दर दर ₹80 प्रतिलिटर वर पोहोचला आहे. म्हशीच्या फुल क्रीम दुधाच्या दरात सर्वाधिक ₹6 प्रतिलिटर वाढ झाली असून दर ₹80 वरून ₹86 प्रतिलिटर झाला आहे.