राज्याला मोठा महसूल देणाऱ्या चाकण औद्योगिक नगरीत नागरिकांना मात्र रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. हा प्रश्न सोडवण्यासाठी चाकणला महानगरपालिका करण्याची मागणी माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे यानंतर सुनेत्रा पवारांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
माजी आमदाराने केली मागणी
चाकणची वाहतूक कोंडी आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी आता महानगरपालिकेची मागणी जोर धरू लागलीय. चाकणमध्ये एक दिवस येऊन पाहा, पुन्हा इथे यावंसं वाटणार नाही, अशा शब्दांत माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर परिस्थिती मांडली. अनेक आंदोलनं आणि आश्वासनांनंतरही वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. चाकण आणि परिसराची लोकसंख्या सुमारे पाच लाखांवर पोहोचल्याचा दाखला देत रस्ते, गटारं आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी चाकणला महानगरपालिका करण्याची मागणी त्यांनी केली. आता सुनेत्रा पवार या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे चाकणकरांचं लक्ष लागलंय.
चाकणमधील वाहतूक कोंडीबद्दल सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
चाकणमधील वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांबद्दल बोलताना सुनेत्रा पवारांनी, "चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावर नाशिक फाटा ते चाकण असा उन्नत मार्ग मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. चाकणपर्यंत मेट्रो धावणार यासाठी काम सुरु आहे. रस्ते विकासाला प्राधान्य देत आहोत. चाकण परिसरावर बारकाईने माझं लक्ष आहे अजित पवारांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणार," असा शब्द स्थानिकांना जाहीर भाषणात दिला. तसेच, "लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे," असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या.
चाकण महापालिका करण्यासंदर्भात काय म्हणाल्या?
चाकणला महापालिका करण्याच्या मागणीला सुनेत्रा पवारांनी होकार दिला आहे. चाकण महापालिका करण्यासंदर्भात बोलताना, "लवकरच जाहीर करणार", असं सूचक विधान सुनेत्रा पवारांनी केलं. "चाकणला महानगरपालिका व्हावी हे दादांचे स्वप्न होते. यासाठी सर्वांचे सहकार्य रहावं," अशी अपेक्षा सुनेत्रा पवारांनी व्यक्त केली.
महापालिका झाल्यास काय फायदा?
कोणतेही शहर महानगरपालिका घोषित झाल्यास त्या शहराच्या विकासासाठी अधिक निधी मिळतो. तसेच शहरामध्ये उत्तम पायाभूत सुविधा निर्माण होण्याच्या संधी वाढतात आणि स्वतंत्र स्थानिक प्रशासनाचे अधिकार वाढण्यासारखे मोठे फायदे मिळतात.
पुण्यात सध्या किती महानगरपालिका?
पुण्यात सध्या पुणे महानगरपालिका (PMC) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) अशा दोन महानगरपालिका असून लवकरच चाकण, हिंजवडी परिसराचा समावेश असलेली महानगरपालिका जाहीर करण्यासंदर्भातील निर्णयाची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील तिसरी महानगरपालिका ही महाराष्ट्रातील 30 वी महानगरपालिका ठरेल.
अजित पवारांनी प्रमाणापेक्षा जास्त निधी दिला
बुधवारी सुनेत्रा पवारांनी खेड तालुक्यातील चाकण, कडूस, राजगुरुनगर परिसराच्या विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचं उद्घाटन व लोकार्पण केलं. यामध्ये, राजगुरुनगर सहकारी बँक लि. च्या चाकण येथील 20 व्या नवीन शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. या ठिकाणी भाषणादरम्यान सुनेत्रा पवारांनी, "खेड तालुक्यातील सोलर ग्रीन एनर्जी प्रकल्प आणि पोलीस चौकी उद्घाटन झालं. खेड तालुक्यातील विकासासाठी अजित पवारांनी प्रमाणापेक्षा जास्त निधी दिला," अशी आठवण सांगितली. तसेच पुढे बोलताना, "आज माझ्या हस्ते बँकेचे उद्घाटन होत असले तरी अप्रत्यक्ष अजित दादांच्या हस्ते उद्घाटन होत असल्यासारखं वाटतंय," असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. यापूर्वी चार शाखांचे उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झाले होते, त्याचसंदर्भातून सुनेत्रा पवारांनी हे विधान केलं. "राजगुरुनगर सहकारी बँकेचा नावलौकिक चांगला आहे. बँकेचा विस्तार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवा बँकेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा," असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या.
अजितदादांची अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मी उभी
"अजितदादांची अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मी उभी आहे. चाकणमधील विकास कामांच्या उद्घाटन झाल्यानंतर लोकांनी भावना मांडल्या. दादांनी सुरू केलेली कामं आज पूर्ण होताना पाहून समाधान मिळत आहे. चाकण परिसराची पहाणी अजित पवारांनी यापूर्वी केली त्यावर उपाययोजना कामं सुरू आहे," असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या.