पुणे क्राईम : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केवळ गाडीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात शिवम करमारे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या शरीरावर तब्बल 700 टाके पडले आहेत. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पुण्यासह ग्रामीण भागात कोयता गँगची दहशत थांबण्याचं नाव घेत नाहीये. राजगुरुनगर शहरात भरदिवसा घडलेल्या या घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत. शिवम करमारे या तरुणाचा केवळ गाडीला कट मारण्यावरून काही मुलांशी वाद झाला होता. या किरकोळ वादाचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी धारदार कोयत्याने शिवमवर हल्ला चढवला. डोक्यात, पाठीवर आणि हातावर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात शिवमची तीन बोटे जागीच तुटली असून त्याचा एक हात कायमचा निकामी झाल्याची माहिती समोर येत आहे. गंभीर रक्तबंबाळ अवस्थेत शिवमला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्या शरीरावर तब्बल 700 टाके घालावे लागले.
क्षुल्लक कारणावरून थेट जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या या अल्पवयीन मुलांच्या वाढत्या हिंसक प्रवृत्तीमुळे पालकांसह पोलिसांची डोकेदुखी वाढली असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.
माजी सरपंच राहुल काळभोर आणि त्याच्या साथीदारांनी हॉटेलमध्ये घुसून राडा घातल्याची घटना घडली. हॉटेल मालक, त्यांचा मुलगा, कामगार आणि ग्राहकांना मारहाण करण्यात आली. काचेचे भांडे तोंडावर मारल्याने हॉटेल मालक जखमी झाले. एवढेच नव्हे तर पोलीस ठाण्यातून परतणाऱ्या तरुणांनाही पुन्हा मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राहुल काळभोरसह चौघांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील कात्रज परिसरात 450 रुपये भाडे घेतल्याच्या रागातून ओला-उबर कॅब चालकाला तिघांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.