पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुक : महायुतीत बिघाडी नको म्हणून पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून शिवसेनेचे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी माघार घेतली असली तरी शिवसेनेचे दुसरे मंञी उदय सामंत यांचे माजी ओएसडी प्रा. सचिन सानप यांनी माञ त्यांचा अर्ज कायम ठेवला. तेव्हाच खरंतर महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले. आज अखेर पुण्यातही 'नाशिक पँटर्न'ची पुनरावृती होताना दिसतेय कारण काल रात्री नंदनवन बंगल्यावर शिवसेनेची एक गुप्त बैठक पार पडली असून त्यात पुणे शिक्षक साठी प्रा. सचिन सानप यांना जाहिर पाठिंबा दिला जाण्याबाबत ठरल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. याबाबत गांभिर्याने विचार करत असल्याचे स्पष्ट सुतोवात शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी झी 24 तासशी बोलताना दिले आहेत.
संजय शिरसाठ यांनी मात्र, अजून काही ठरलं नसल्याचा दावा केला. प्रा. सचिन सानप यांना विचारले असता त्यांनीही होय, मी शिवसेनेकडे पाठिंब्यासाठी विनंती केली असून याबाबतच अंतिम निर्णय शिंदेसाहेबच घेऊ शकतात असं ते म्हणाले. पुण्यात नाशिक पँटर्न चालणार का? असं थेट विचारताच त्यांनी पुण्यात शिक्षक पँटर्न नक्की चालेल, असं सूचक उत्तर देत वेळ मारून नेली.
दरम्यान, पुणे शिक्षकच्या जागेवरून शिवसेनेनं सुरू केलेल्या या अघोषित बंडखोरीबाबत भाजपकडून सध्या तरी सावध पविञा घेतला जात असल्याचं सांगितले जात आहे. तुमची तशी इच्छाच असेल तर मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या असाही निरोप सेनेला भाजपकडून दिला गेल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. थोडक्यात कायतर भाजपने देखील या मैत्रीपूर्ण लढतीची मानसिक तयारी केल्याचं स्पष्ट होत आहे. भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे मात्र, आपण अजूनही महायुतीचेच उमेदवार असल्याचे ठासून सांगत आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघाचा विचार करायचा झालातर भाजपकडून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री समर्थक आणि कोल्हापूरच्या विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे हे मैदानात आहेत. त्यांच्या संस्थेची साधारण 6-8 हजार हक्काची मतं आहेत. पण त्यांच्याच कोल्हापुरातून काँग्रेसचे माजी मंत्री आणि संस्था चालक सतेज पाटील यांचे समर्थक आणि विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांना पवार संचलित सातारच्या रयत शिक्षक संघटनेचा पाठिंबा मिळणार हे उघड हे कारण आसगावकर हे कांग्रेससोबत मविआचे पण अधिकृत उमेदवार हे देखील कोल्हापुरचेच आहेत.
दुसरीकडे माजी आमदार दत्ता सावंत हे देखील मैदानात असून त्यांच्याकडेही सोलापूर जिल्ह्यातील हक्काची अशी काही मतं आहेत. त्याच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरचे प्रा. बी पी रोंगे देखील रिंगणात आहेत. ते भाजपकडून इच्छुक होते तर सावंत हे मविआकडून इच्छुक होते. थोडक्यात या दोन्ही अपक्ष उमेदवारांमुळे सोलापुर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात मतविभागणी होऊ शकते.
पुणे शहरातील सिनिअर, ज्युनिअर प्राध्यापक संघटनाचा आपल्याला पाठिंबा असल्याचा ते दावा करतात. त्यात मंगेश चिवटे यांनी नोंदवून घेतलेल्या एकनाथ शिक्षक संघटनेची मतं आपल्याला मिळावीत, यासाठी ते जोरदार प्रयत्नशील आहेत. त्यासाठीच रात्री नंदनवनला गुप्त बैठक झाल्याचं सूत्रांकडून कळतंय. समजा शिवसेनेनं मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका जाहिर केलीच तर पुणे शिक्षक मतदारसंघातली लढत नक्कीच रंगतदार होणार यात शंका नाही. कारण ती गावडे, आसगावकर, सानप आणि सावंत अशी चौरंगी लढत असेल.