अवयव दानासंदर्भात मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. याचे सकारात्मक परिणाम हळू हळू दिसून येत आहेत. आपली लाडकी व्यक्ती आपल्या सोडून गेल्यानंतरही समाजभान जपत अवयवदानाच्या माध्यमातून इतरांना जीवन देणाऱ्या अनेक प्रेरणादायी कथा अधून मधून समोर येत असतात. असाच एक प्रकार सोलापूरमधून समोर आलाय. येथील एका 9 वर्षीय मुलाच्या निधानंतर त्याच्या अवयवदानाच्या माध्यमातून पाच जणांना जीवनदान मिळालं आहे.
पाच रुग्णांना नव्याने आयुष्य जगण्याचं बळ
मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडी येथील थिटे कुटुंबाने आयुष्यातील सर्वात दु:खद प्रसंगीही समाजभान जपत समाजासमोर आदर्श घालून दिला आहे. अपघातात प्राण गमावलेल्या आपल्या नऊ वर्षाच्या लेकराचे अवयवदान करून या कुटुंबाने तब्बल पाच रुग्णांना नव्याने आयुष्य जगण्याचं बळ दिलं आहे. "आपला मुलगा जगातून गेला तरी त्याचा श्वास दुसऱ्याच्या रूपात जिवंत राहील," या भावनेतून थिटे कुटुंबाने हा कठोर पण तितकाच महत्त्वाचा निर्णय घेतला.
या मुलासोबत झालं काय?
मोहोळ येथील नऊ वर्षीय मुलगा 23 सप्टेंबर रोजी घरासमोर सायकलवर खेळताना कारच्या धडकेत गंभीर जखमी झाला. सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी डॉक्टरांनी या मुलाला 'ब्रेन डेड' घोषित केले. एकुलत्या एका मुलाच्या निधनाने खचलेल्या पालकांना डॉक्टरांनी त्यावेळी अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. ग्रामीण भागातील या कुटुंबाने आणि आजोबांनी क्षणाचाही विलंब न लावता या निर्णयास भावनिक पाठिंबा दिला.
हृदय रशियन बालकाला देणार जीवनदान
मोहोळमधील या चिमुरड्याचे हृदय चेन्नई येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका तीन वर्षांच्या रशियन बालकाला बसवले जाणार आहे. चेन्नईहून आलेले तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक एअर अॅम्ब्युलान्सने सोलापुरात दाखल झाले आणि हृदय चेन्नईकडे रवाना करण्यात आले.
लिव्हर, किडन्या अन् डोळेही दान
तसेच, त्याचे लिव्हर आणि दोन्ही किडण्या पुण्यातील रुग्णांसाठी पाठवण्यात आल्या. त्याचप्रमाणे दोन्ही डोळेही दान करण्यात आले असून यामधून सोलापूरच्या दोन अंध रुग्णांना दृष्टी मिळणार आहे.
एक जण वाचवू शकतो आठ जणांचे प्राण
अवयवदानासंदर्भात अनेक भ्रामक कल्पना असून मागील काही काळात झालेल्या जनजागृतीमध्ये आता ग्रामीण भागामधूनही अनेकजण अशा गंभीर काळातही पुढाकार घेऊन इतरांना जीवनदान देण्यास प्राधान्य देत आहेत. अवयवदानासंदर्भात कोणत्याही रुग्णालयामध्ये सहज माहिती उपलब्ध होते. एक दाता आपल्या अवयवांद्वारे आठ लोकांचे प्राण वाचवू शकतो. राज्य अवयवदानात देशात आघाडीवर आहे, विशेषतः पुणे आणि मुंबई विभागात दानांची संख्या चांगली आहे.