कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दर्शनाला गेलेल्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात होऊन चार तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कराड शहराजवळ घडली आहे. साताऱ्यामधील कराड शहराजवळ पुणे- बेंगलोर महामार्गावर उड्डाणपूलावर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये स्कॉर्पिओ आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या धडकेमध्ये चौघांचा मृत्यू झाला असून तीनजण जखमी झाले आहेत. सर्व मयत तरुण हे 20 ते 25 वर्ष वयोगटातील आहेत. विशेष म्हणजे हे चौघेही एकाच गावातील रहिवाशी आहेत.
नव्या उड्डाणपुलावरील पहिलाच अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामधील सर्व मयत तरुण हे कोल्हापूरचे आहेत. हे सर्वजण दसऱ्यानिमित्त कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला गेले होते. दर्शनाहून परताना हा भीषण अपघात झाला. कोल्हापूरवरुन साताऱ्यातील खटाव तालुक्यातील कतरखटाव गावाकडे परत निघालेल्या या स्कॉर्पिओची ट्रकशी धडक झाली. कराड शहराजवळ काही दिवसांपूर्वीच नव्याने सुरु झालेल्या सहापदरी उड्डाणपुलावर हा अपघात झाला. या उड्डाणपुलावरील हा पहिलाच भीषण अपघात आहे. जखमींवर कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी चक्काचूर झालेल्या कारचे अवशेष आणि रस्त्यावर सांडलेलं रक्त असं हादरवणारं चित्र दिसत होतं.
पोलिसांची घटनास्थळी धाव
या अपघाताची माहिती मिळताच कराड डीवायएसपी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पीआय दत्तात्रय दराडे व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था पोलिसांनी केली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
अपघात झाला कसा?
हा अपघात नेमका कशामुळे झाला? नक्की अपघाताच्या आधी काय घडलं? याचा तपास पोलीस करत आहेत. अपघातातून वाचलेल्या तरुणांकडे यासंदर्भात चौकशी केली जाण्याची शक्यता असून त्यांच्यावरील उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थीर झाल्यावर याबद्दलची विचारपूस केली जाईल असं सांगितलं जात आहे. सध्या तरी सदर प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई सुरू आहे. मात्र गावातील चार तरुण पोरं गमावल्याने कतरखटाव गावामध्ये शोककळा पसरली आहे. देवदर्शनासाठी गेलेला हाताशी आलेला तरुण मुलगा गमावल्याने चारही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे
1) तेजस देशमुख (चालक वय- 25 वर्षे)
2) सागर निंबाळकर (वय-23 वर्षे)
3) सुयश चिंचकर (वय-20 वर्षे)
4)रोहीत धोत्रे (वय-21 वर्षे)
जखमींची नावे
1) ऋतुराज दुबळे (वय-21 वर्षे)
2) शंतनू शिंगाडे (वय-20 वर्षे)
3) अमन तांबोळी (वय-23 वर्षे)