'फोटो चोरणारा पक्ष' म्हणणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या, 'कॉपी करुन पास होणारे...'
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराकडून प्रचार पत्रिकेवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो वापरण्यात आल्याने शिवसेनेने टीका केली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराकडून प्रचार पत्रिकेवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो वापरण्यात आल्याने शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमने-सामने आले आहेत. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी जयंत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षदेखील फोटो चोरणारा पक्ष आहे, अशी टीका केली आहे. सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सुनील मोदी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. यानंतर सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा फोटो वापरण्यावरुन होणाऱ्या टीकेसंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, "महाविकास आघाडी म्हणून संपूर्ण राज्यात पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहोत. लोकशाहीमध्ये कोणी काही बोललेलं मनाला लावून घ्यायचं नसतं. कॉपी करून पास होणाऱ्यांपैकी आम्ही नाही. त्यामुळे लोक बोलत राहतात आपण ऐकून घेण्याची ताकद ठेवली पाहिजे. सहन करायला काही कमीपणा नसतो".
उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांचा मला कुठलाही फोन आलेला नाही. आम्ही आंदोलनात एकत्रच असतो. मला कोणीही काही सांगितलेलं नाही. पक्ष पातळीवर आम्हाला कोणाचेही फोन आलेले नाहीत. फोटो वापरला म्हणून कारवाईबाबत माझ्यापर्यंत काहीही आलेले नाही, माझ्या कानावर आल्यावर बघू असंही यावेळी त्यांनी म्हटलं. तसंच प्रत्येक जण जिंकण्यासाठीच लढत असतात मात्र अगदी ताकतवान उमेदवार आम्ही उभे केले आहेत. ते नक्कीच विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊतांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर त्या म्हणाल्या की, "संजय राऊत हे आमचे मोठे नेते आहेत. महाविकास आघाडी आणि शिवसेनेची माहिती ते देशाला रोज देत असतात. कोणाचाही अवमान करायचा असा आमच्या कुणाच्याही ध्यानीमनी नाही".
पुढे त्यांनी सांगितलं की, "राज्यात प्रचंड प्रमाणात दुष्काळ आहे. मात्र या दुष्काळाचं राजकारण करण्यात आम्हाला काहीही रस नाही. हेक्टरी एक लाख रुपयांची चर्चा आहे, मात्र 5000 रुपये खूपच कमी आहेत. आत्ताचे पाच आणि आधीचे चार असे नऊ हजार रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्याला तातडीने दिले पाहिजे. एक लाख रुपये हेक्टरी ही आमची मागणी आहे. ते देखील दिलेच पाहिजेत. जुनी रोजगार हमी योजना लागू करायला पाहिजे. याबाबत दोन पत्र दिलेली आहेत, आम्ही दुष्काळाचा राजकारण करत नाही".
"आम्ही ज्ञानेश कुमार यांना विरोध करत नाही, तर त्यांच्या कृतीचा विरोध करत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं. न्यायालयावरील मोर्चावर म्हणाल्या की, "आम्ही न्यायालयावर मोर्चा काढला नव्हता. आम्ही याचिका दाखल करायला गेलो होतो. लोक त्यामध्ये उत्स्फूर्तपणे आले होते. उत्स्फूर्तपणे एवढे लोक रस्त्यावर उतरत आहेत. आज मतं चोरली जात आहेत, उद्या काय काय चोरतील काय माहित. आम्ही टाकलेल्या याचिकेमध्ये 14 चुका काढल्या. निवडणूक आयोगाने ज्या चुका काढल्या त्याबद्दल भारत सरकार काय करत आहे? उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल अशा किती ठिकाणी सांगू? मी तर म्हणते माझ्या बारामती मतदार संघापासून चौकशी करण्यासाठी सुरुवात करा. आम्ही लोकसभा विधानसभा लढताना शेवटच्या दिवसापर्यंत मतदारा नोंदणी होत असते, आम्ही सत्तेत असतो तरी आमचं हेच मत असतं की यंत्रणा एका सिस्टम प्रमाणे चालली पाहिजे. तुम्ही सगळेच नियम ढाब्यावर बसवणार असला तर काय उपयोग?," अशी विचारणा त्यांनी केली.