केंद्र सरकारने संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात सादर केल्या जाणाऱ्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकावरून देशभरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. देशभरातील अनेक प्रादेशिक पक्षांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील विधेयकाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येतंय. शरद पवारांच्या या निर्णयावरुन काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. डिलिमिटेशन विधेयकाला काँग्रेस विरोध करत असतानाच काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मात्र विधेयकाला पाठिंबा दिला आहे.
डिलिमिटेशन विधेयकावरुन सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यात मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय. सुशीलकुमार शिंदे यांनी विधेयकाला पाठिंबा दिला आहे तर प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. माझं मत आहे डीलिमिटेशन व्हायला पाहिजे, असं मत सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. तर, राष्ट्रवादी शरद पवार गट देशाशी आणि संविधानाशी गद्दारी करत आहे, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसने विरोध केला आहे. पण माझं मत आहे डीलिमिटेशन व्हायला पाहिजे. वेळ खूप निघून गेलेला आहे. लोकसंख्या जशी वाढते तसे प्रतिनिधी मिळायला पाहिजेत. त्यामुळे डिलीमिटेशन होणं जरुरीच आहे. आमच्या पक्षाची ती भूमिका आहे की 2011 च्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही खडीसुमारी करून त्याप्रमाणे करावं. परंतु आता काळ पुढे गेलेला आहे डीलिमिटेशन सर्व संमतीने झाल असता तर फार बरं झालं असतं, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गट देशाशी आणि संविधानाशी गद्दारी करत आहे. देशाच्या आणि संविधानाच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी शरद पवार गट डिलिमिटेशन पाठींबा देत आहे, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, द्रमुकचे 22 खासदार विधेयकाच्या बाजूने मतदान करणार असून चेन्नईत झालेल्या बैठकीत पाठिंब्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा. तर बसपाचाही विधेयकाला समर्थन देण्याचा निर्णय झाला आहे. यामुळं डिलिमिटेशन विधेयकाचा लोकसभेतील मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.
डिलिमिटेनविरोधात रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीची तातडीची बैठक सुरु आहे. मात्र आघाडीतील अनेक घटक पक्षांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी शरद पवारांच्या खासदारांची बैठकीला दांडी तर निमंत्रण देऊनही आप आणि बिजू जनता दलाची पाठ यामुळं इंडिया आघाडीला घरघर लागल्याची चर्चा.