'कैसा हराया' म्हणणाऱ्या सहर शेखचे वडील युनूस शेख यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश? फोटो व्हायरल, म्हणाले 'मी यापुढे...'
एमआयएमची नगरसेविका सहर शेखचे वडील युनूस शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा असून, एक फोटो व्हायरल झाला आहे.
ठाणे महापालिकेतील एमआयएम पक्षाची नगरसेविका सहर शेख पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण तिचे वडील युनूस शेख यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा आहे. या दाव्याला दुजोरा देणारा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये युनूस शेख शिवसेना नेत्यांसोबत असून, त्यांच्या गळ्यातही शिवसेनेचा गमछा आहे. मात्र युनूस शेख यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. अखिल भारतीय भारतीय केबल सेनेच्या कळवा मुंब्रा अध्यक्षपदी आपली निवड झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
युनूस शेख यांची मुलगी सहर शेख ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आली होती. विजयानंतर तिने केलेलं एक भाषण व्हायरल झालं होतं. या भाषणात तिने कैसा हराया म्हणत विरोधकांना डिवचलं होतं. तसंच पुढील काळात संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे असं म्हटलं होतं. तिच्या या विधानानंतर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. टीका करणाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचाही समावेश होता. मात्र त्यानंतरही शिंदेंच्या पक्षांकडून युनूस शेख यांना मानाचं स्थान दिल्याने चर्चा रंगल्या आहेत.
पत्रात काय लिहिलं आहे?
पत्रात युनूस शेख यांनी एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार, शिवसेना अखिल भारतीय केबल सेना अध्यक्ष कळवा मुंब्रा विधानसभा नियुक्ती करण्यात आल्याचा उल्लेख आहे. ही नियुक्ती एका वर्षासाठी करण्यात आली आहे.
पत्रात पुढे लिहिलं आहे की, वंदनीय हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. यावेळी त्यांनी प्रत्येक महिन्याच्या कामाचा लेखी अहवाल बाळासाहेब भवन कार्यालयात सादर कऱण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
युनूस शेख यांनी काय म्हटलं आहे?
युनूस शेख यांनी आपण शिवसेनेत प्रवेश केला असून, ही फक्त एक केबल ऑपरेटर्सची 40 वर्ष जुनी विंग असल्याचं सांगितलं आहे. "माझा केबल आणि इंटरनेटचा व्यवसाय आहे. अखिल भारतीय केबल सेनेत यात सर्व केबल ऑपरेटर्स आहेत आणि मीदेखील आहे. आता माझ्यावर कळवा-मुंब्रा विधानसभेचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. येथील सर्व केबल आणि इंटरनेट ऑपरेटर्सना एकत्र घेऊन मजबूत करायचं आहे," असं युनूस शेख यांनी म्हटलं आहे.
"माझ्या मुलीने पक्ष वाढवण्यासाठी मुंब्रा हिरवा करु म्हटलं होतं. मग हिरवा करु, ठाणे आला तर भगवा करु," असंही ते म्हणाले. जर मला पक्षप्रवेश करायचाच असेल तर एकनाथ शिंदेंच्या हातूनच नियुक्तीपत्र घेऊ असंही त्यांनी विधान केलं आहे.
"शिवसेना वाढवण्यासाठी माझ्या घरात नाही. ती वाढत चालली आहे. एकनाथ शिंदेंचं काम पाहून कुठून कुठून आमदार, खासदार येत आहेत. अनेक राजकारणी शिवसेनेत येत असताना, आम्ही आल्याने मजबूत होईल असं नाही. शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वात वाढत असून, आमची गरज नाही," असंही ते म्हणाले. तसंच भविष्यात एमआयएम आणि शिवसेनेचे संबंध सुधारतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाडांना मोठा फटका बसेल असा दावा त्यांनी केला आहे. मुलीनेही माझ्या निर्णयाचं समर्थन केलं असून, पुढे जाण्यास सांगितलं आहे अशी माहिती त्यांनी दिली. हा फक्त एक बिझनेसचा भाग आहे असंही ते म्हणाले आहेत.