मुंबईला पाणीपुरवठा हा ठाणे व पालघर जिल्ह्यातील सात धरणांतून होतो. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. मात्र पुढच्या काही वर्षांत या धरणातील पाणीपुरवठा मुंबईसाठी कमी पडू शकतो. यासाठीच पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात आणखी एक धरण बांधण्यात येत आहे. मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या गारगाई प्रकल्पाच्या उभारणीतील एक महत्त्वाचा अडथळा अखेर दूर झाला आहे
गारगाई प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या केंद्रीय वन्यजीव महामंडळाची अंतिम मंजुरी मुंबई महापालिकेला मिळाली आहे. आता राज्य आणि केंद्रीय वन मंत्रालयांच्या दोन उर्वरित मंजुरी मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. येत्या महिना-दीड महिन्यात या परवानग्या मिळवून नवीन वर्षापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे उद्दिष्टय आहे.
धरणाचे काम नियोजनानुसार पूर्ण झाल्यास जून 2029 पासून मुंबईकरांना दररोज 440 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. मोडकसागर धरणापासून जलाशयापर्यंत 1.6 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार आहे. त्यानंतर या जलाशयातून जलवाहिनीद्वारे भांडुप संकुलापर्यंत पाणी आणले जाईल. प्रस्तावित धरणाची लांबी 179.40 मीटर, तर उंची 69 मीटर असेल.
गारगाई धरणामुळे भारताच्या आर्थिक राजधानीच्या पाणीपुरवठ्यात दररोज 450 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडण्याचा अंदाज आहे. गारगाई धरणामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या तानसा वन्यजीव अभयारण्यातील सुमारे 650 हेक्टर वनजमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, बीएमसीने आपल्या प्रकल्प क्षेत्राबाहेरील जंगलाच्या उत्तरेकडील भागासाठी एक योजना प्रस्तावित केली आहे, जिथे दाट हिरवळ आहे, परंतु शाकाहारी प्राणी खूप कमी आहेत.
या प्रकल्पासाठी एकूण 844 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून त्यामध्ये 657 हेक्टर वनजमीन आणि 186 हेक्टर खासगी जमिनीचा समावेश आहे. यामुळे परिसरातील 6 गावांवर परिणाम होणार असून (2 गावे पूर्णतः तर 4 गावे अंशतः बाधित), बाधित गावांचे वाडा तालुक्यातील देवळी गावात पुनर्वसन केले जाणार आहे.
केंद्रीय वन्यजीव 66 महामंडळाकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारची वन विभागाची मंजुरी बाकी आहे. टप्प्यात या दोन्ही परवानग्या त्वरित घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र मंजुरीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे, असं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी म्हटलं आहे.