ठाणे शहरामध्ये सध्या रिंग रुट मेट्रोवरुन वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. शहराअंतर्गत मेट्रोच्या या प्रकल्पाला विरोध होताना दिसतोय. तर दुसरीकडे महानगरपालिका निवडणुकीच्या आधी मोठा गजावाजा करत मेट्रो लाइन 4 चं उद्घाटन करण्यात आल्यानंतरही दीड वर्षानंतरही या मार्गावर मेट्रो धावलेली नाही. असं असतानाच रिंग रुट मेट्रोचं कामही सुरु झालं आहे. दुसरीकडे कल्याण-ठाणे मेट्रोचं कामही सुरु असल्याने नेमक्या किती मेट्रो ठाण्यात धावणार असा संभ्रम ठाणेकरांना पडलाय. अनेकांना ठाण्यात नेमके मेट्रोचे किती आणि कोणते मार्ग असणार याबद्दल संभ्रम आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण ठाण्यातून नक्की कोणते मार्ग, कुठे जाणार याबद्दल जाणून घेऊयात...
पहिला मार्ग
ठाण्यातील सर्वात महत्त्वाचा मेट्रो मार्ग म्हणजे मुंबई मेट्रो लाईन 4! हा मार्ग ग्रीन लाईन म्हणून ओळखला जाणार जो वडाळा ते कासारवडवलीदरम्यान असेल. हा ठाणेकरांसाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग असून याच्या पहिल्या टप्प्याचे (गायमुख ते कॅडबरी जंक्शन) काम अंतिम टप्प्यात आहे आणि डिसेंबर 2026 पर्यंत तो सुरू होणे अपेक्षित आहे. या मेट्रोमुळे ठाणे थेट मध्य मुंबईशी (वडाळा) जोडले जाईल.
मार्ग कसा असणार?
वडाळा - घाटकोपर - मुलुंड - तीन हात नाका - कॅडबरी जंक्शन - कासारवडवली.
दुसरा मार्ग
मेट्रो लाईन 4 चं एक्सटेन्शन म्हणजेच मेट्रो लाईन 4 ए हा मार्ग देखील ठाण्यातच असणार आहे. ही मेट्रो कासारवडवली ते गायमुख या मार्गावर धावणार आहे. हा लाईन 4 चा हा विस्तार घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. या मार्गावर गवाणपाडा आणि गायमुख अशी दोनच स्थानके असतील. हा मार्ग 2.7 किमीचा असेल.
तिसरा मार्ग
मेट्रो लाईन 5 हा मार्ग सुद्धा ठाण्यातून जाणार असून तो ऑरेंज लाईन नावानेही ओळखला जाईल. हा मार्ग ठाणे ते भिवंडी-कल्याणदरम्यान असणार आहे. ठाणे (कापूरबावडी) - बाळकुम - भिवंडी - कल्याण असा याचा साधारण मार्ग असेल. बाळकुम नाका येथे हा मार्ग ठाणे रिंग मेट्रोला जोडला जाणार असल्यामुळे भिवंडी-कल्याणच्या प्रवाशांना शहरांतर्गत प्रवास करणे सोपे होईल.
चौथा मार्ग
मेट्रो लाईन 10 ही गायमुख ते मिरा रोडदरम्यान असेल. हा ठाण्यातला चौथा मेट्रो प्रोजेक्ट ठरेल. घोडबंदर रोडवरून थेट मिरा-भाईंदरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा मार्ग तयार केला जात आहे. साधारण 9.67 किलोमीटरच्या या उन्नत मार्गावर मेट्रोची पाच स्थानके असतील.
पाचवा मार्ग
ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो (Thane Ring Metro) हा प्रकल्प ठाणे शहराच्या अंतर्गत भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बांधला जाणार आहे. ही विशेष वर्तुळाकार मार्गावर फिरणारी म्हणजेच रिंग मेट्रो ठाणे शहराला इंटरनल कनेक्टिव्हीटी पुरवणार आहे. हा मार्ग एकूण 29 किलोमीटर लांबीचा असेल आणि त्यावर 22 स्थानके असतील.
कसा असेल हा मार्ग?
ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो ठाणे रेल्वे स्टेशनवरून सुरू होऊन वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, उपवन, वसंत विहार, कासारवडवली (डोंगरीपाडा), वाघबीळ, हिरा नंदानी इस्टेट, बाळकुम, राबोडी आणि पुन्हा ठाणे स्टेशन अशी चक्राकार फिरणार आहे. या 22 स्थानकांपैकी 20 स्थानके उन्नत (वर) असतील, तर ठाणे रेल्वे स्थानकाजवळील 2 स्थानके भूमिगत (Underground) असतील. हा मार्ग मुंबई मेट्रो लाईन 4 आणि 5 ला वेगवेगळ्या जंक्शनवर जोडला जाईल.