SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

ठाण्यातून नेमक्या किती मार्गांवर धावणार मेट्रो? कसा असणार रूट? 99% ठाणेकरांनाच नाही कल्पना

मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाण्यामध्ये सध्या एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरु असल्याने ठाण्यातून नेमक्या किती मेट्रो आणि कुठून कुठे जाणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात अगदी सोप्या भाषेत...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 02, 2026, 08:31 AM IST | Updated: Oct 02, 2026, 08:47 AM IST
Image Credit: ठाण्यात अनेक ठिकाणी काम सुरु असल्याने ठाणेकरच गोंधळलेत अशी स्थिती (प्रातिनिधिक फोटो)
Join

ठाणे शहरामध्ये सध्या रिंग रुट मेट्रोवरुन वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. शहराअंतर्गत मेट्रोच्या या प्रकल्पाला विरोध होताना दिसतोय. तर दुसरीकडे महानगरपालिका निवडणुकीच्या आधी मोठा गजावाजा करत मेट्रो लाइन 4 चं उद्घाटन करण्यात आल्यानंतरही दीड वर्षानंतरही या मार्गावर मेट्रो धावलेली नाही. असं असतानाच रिंग रुट मेट्रोचं कामही सुरु झालं आहे. दुसरीकडे कल्याण-ठाणे मेट्रोचं कामही सुरु असल्याने नेमक्या किती मेट्रो ठाण्यात धावणार असा संभ्रम ठाणेकरांना पडलाय. अनेकांना ठाण्यात नेमके मेट्रोचे किती आणि कोणते मार्ग असणार याबद्दल संभ्रम आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण ठाण्यातून नक्की कोणते मार्ग, कुठे जाणार याबद्दल जाणून घेऊयात...

पहिला मार्ग

ठाण्यातील सर्वात महत्त्वाचा मेट्रो मार्ग म्हणजे मुंबई मेट्रो लाईन 4! हा मार्ग ग्रीन लाईन म्हणून ओळखला जाणार जो वडाळा ते कासारवडवलीदरम्यान असेल. हा ठाणेकरांसाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग असून याच्या पहिल्या टप्प्याचे (गायमुख ते कॅडबरी जंक्शन) काम अंतिम टप्प्यात आहे आणि डिसेंबर 2026 पर्यंत तो सुरू होणे अपेक्षित आहे. या मेट्रोमुळे ठाणे थेट मध्य मुंबईशी (वडाळा) जोडले जाईल.

मार्ग कसा असणार? 
वडाळा - घाटकोपर - मुलुंड - तीन हात नाका - कॅडबरी जंक्शन - कासारवडवली.

दुसरा मार्ग

मेट्रो लाईन 4 चं एक्सटेन्शन म्हणजेच  मेट्रो लाईन 4 ए हा मार्ग देखील ठाण्यातच असणार आहे. ही मेट्रो कासारवडवली ते गायमुख या मार्गावर धावणार आहे. हा लाईन 4 चा हा विस्तार घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. या मार्गावर गवाणपाडा आणि गायमुख अशी दोनच स्थानके असतील. हा मार्ग 2.7 किमीचा असेल.

तिसरा मार्ग

मेट्रो लाईन 5 हा मार्ग सुद्धा ठाण्यातून जाणार असून तो ऑरेंज लाईन नावानेही ओळखला जाईल. हा मार्ग ठाणे ते भिवंडी-कल्याणदरम्यान असणार आहे. ठाणे (कापूरबावडी) - बाळकुम - भिवंडी - कल्याण असा याचा साधारण मार्ग असेल.  बाळकुम नाका येथे हा मार्ग ठाणे रिंग मेट्रोला जोडला जाणार असल्यामुळे भिवंडी-कल्याणच्या प्रवाशांना शहरांतर्गत प्रवास करणे सोपे होईल.

चौथा मार्ग

मेट्रो लाईन 10 ही गायमुख ते मिरा रोडदरम्यान असेल. हा ठाण्यातला चौथा मेट्रो प्रोजेक्ट ठरेल. घोडबंदर रोडवरून थेट मिरा-भाईंदरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा मार्ग तयार केला जात आहे. साधारण 9.67 किलोमीटरच्या या उन्नत मार्गावर मेट्रोची पाच स्थानके असतील.

पाचवा मार्ग

ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो (Thane Ring Metro) हा प्रकल्प ठाणे शहराच्या अंतर्गत भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बांधला जाणार आहे. ही विशेष वर्तुळाकार मार्गावर फिरणारी म्हणजेच रिंग मेट्रो ठाणे शहराला इंटरनल कनेक्टिव्हीटी पुरवणार आहे. हा मार्ग एकूण 29 किलोमीटर लांबीचा असेल आणि त्यावर 22 स्थानके असतील.

कसा असेल हा मार्ग?
ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो ठाणे रेल्वे स्टेशनवरून सुरू होऊन वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, उपवन, वसंत विहार, कासारवडवली (डोंगरीपाडा), वाघबीळ, हिरा नंदानी इस्टेट, बाळकुम, राबोडी आणि पुन्हा ठाणे स्टेशन अशी चक्राकार फिरणार आहे. या 22 स्थानकांपैकी 20 स्थानके उन्नत (वर) असतील, तर ठाणे रेल्वे स्थानकाजवळील 2 स्थानके भूमिगत (Underground) असतील. हा मार्ग मुंबई मेट्रो लाईन 4 आणि 5 ला वेगवेगळ्या जंक्शनवर जोडला जाईल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES