ज्या कर्जत-भीमाशंकरच्या जंगलात होतेय वृक्षतोड त्याच पर्वतरांगेत आहे 'महाराष्ट्राच्या दुर्गवैभवातील अनोखे रत्न'; उद्धव ठाकरेंनी स्वत: Click केलेले Aerial फोटो शेअर करत दिली माहिती
कर्जत-भीमाशंकर येथे टोरंटच्या प्रकल्पासाठी 32 हजारांहून अधिक झाडं कापली जाणार असून यावरुन राजकीय वातावरण तापलेलं असतानाच उद्धव ठाकरेंनी याच भागातील एका सुंदर गडाचे स्वत: काढलेले फोटो शेअर करत त्याची माहिती दिलीये...
कर्जत-भीमाशंकरच्या हिरव्यागार पर्वतरांगेत उभा असलेला ऐतिहासिक कोथळीगड चर्चेत असून, "पेठ गावाजवळील काळ्याकभिन्न कातळाचा बाणेदार सुळका म्हणजे महाराष्ट्राच्या दुर्गवैभवातील अनोखे रत्न" असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये कोथळीगडासंदर्भात बोलताना केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या काळात असलेले महत्व उद्धव ठाकरे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून नमूद केलेलं आहे. कोकण आणि मावळ प्रांतावर नजर ठेवण्यासाठी कोथळीगडाचे अधिक महत्त्व असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. कोलिंबा आणि सावळे घाटातील व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या गडाचा वापर व्हायचा, असाही उल्लेख पोस्टमध्ये आहे. हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात टेहळणी आणि लष्करी हालचालींसाठी महत्त्वाची चौकी म्हणून वापरला जायचा. कातळात खोदलेल्या गुहा, पाण्याच्या टाक्या आणि भैरोबाची गुहा ही गडाचे वैशिष्ट्यं आहेत. उद्धव ठाकरेंनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेली पोस्ट जशीच्या तशी खालीलप्रमाणे:
"कर्जत-भीमाशंकरच्या हिरव्यागार पर्वतरांगेत पेठ गावाजवळ उभा असलेला काळ्याकभिन्न कातळाचा हा बाणेदार सुळका.. महाराष्ट्राच्या दुर्गवैभवातील हे अनोखे रत्न, पेठचा किल्ला.. कोथळीगड..!
कोकण आणि मावळप्रांताच्या द-याखोऱ्यांवर,कोलिंबा आणि सावळे घाटाच्या व्यापारी मार्गावर करडी नजर रोखून असलेला. भौगोलिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा सह्याद्रीच्या मस्तकावरील हा जागृत प्रहरी कोथळीगड...
छत्रपती शिवरायांनी अत्यंत भक्कम केलेल्या या दुर्गाचा वापर उत्तर कोकण आणि कल्याण-भिवंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्करी चौकी म्हणून केला. टेहळणी, संदेशवहन, सैन्य हालचाल आणि गुप्त शस्त्रागार व दारुगोळा साठ्याचा हा मुख्य आधारवड होता... कोथळीगड..!
पेठ गावातून वर गेल्यावर सामोऱ्या येतात कातळ कड्यांच्या पोटात खोदलेल्या गुहा! देवीची गुहा व पाण्याच्या टाक्यानंतर दिसते आकाराने मोठी असलेली भैरोबाची गुहा, आत गुहेच्या छताला आधार देणारे कोरीवकाम केलेले शिल्पस्तंभ आहे. 13 व्या शतकातील किंबहुना आधीपासूनची विस्मयीत करणारी ही स्थापत्यकला. या गडाचे सर्वात विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे आकाशाला भिडू पाहणाऱ्या या कातळी सुळक्याच्या पोटात कोरलेले उर्ध्वमुखी भुयार! आत खडकात कोरलेला गोलाकार वळणे घेत वर जाणारा दगडी जिना, बाहेरील जगाला न दिसणारा, माथ्यावर सुरक्षित पोहोचवणारा हा भुयारी जिना म्हणजे प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्राचा,अभियांत्रिकी बुद्धिमत्तेचा अद्भुत आविष्कार..!
छत्रपती संभाजीराजांच्या काळात अत्यंत महत्त्वाचा ठरलेला हा दुर्ग घेण्यासाठी औरंगजेबाने 1684 ला अब्दुल कादीरला पाठवले. गड कितीही भक्कम असला तरी विश्वासघाताची भेग त्याला घातक ठरते. किल्लेदार नारो त्रिंबक रसद आणण्यासाठी गडाबाहेर पडले आणि विश्वासघाताने गडाचे दरवाजे उघडले गेले. अभेद्य दुर्गरचना असहाय्य ठरली. औरंगजेबाने गड जिंकल्याचे बक्षीस म्हणून अब्दुल कादीरला सोन्याची किल्ली भेट दिली आणि गडाचे नाव ठेवले मिफ्तहुलफतेह म्हणजेच विजयाची गुरुकिल्ली..!
पुढे 2 नोव्हेंबर 1817 ला बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापूराव यांनी हा गड जिंकला. मात्र तो पुन्हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. मानवी स्थापत्याची,इतिहासाची आणि निसर्गाशी साधलेल्या मैत्रीची कहाणी म्हणजे कोथळीगड...!
आपल्या माथ्यावरून कर्जत-भीमाशंकरचे घनदाट जंगल, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिधगड, माणिकगड, पिशाळगड अशा प्रचंड देखण्या मुलूखाचे दर्शन घडवणारा, मराठी मनांचा अभिमानी मुकुटमणी, सह्याद्रीच्या काळजात कोरलेली शौर्याची, त्यागाची ही अमिट मुद्रा, स्वांतत्र्याचा, स्वराज्याचा हा तेजस्वी दिपस्तंभ... कोथळीगड..!!
या वरील पोस्टमधील फोटो उद्धव ठाकरे यांनी काढले असून माहिती शिवसेनेचे उपनेते नितीन बानूगडे पाटील यांनी लिहली आहे.