नवी मुंबईतील पाम बीचवर हिट अँड रन प्रकरण! अर्धा तास रस्त्यावरच 16 वर्षीय मुलाचा तडफडत राहिला अन् मग...
नवी मुंबईतील पाम बीचवर 16 वर्षीय मुलाचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. भरधाव अज्ञात वाहनाने स्कूटीस्वार तरुणाला जोरदार धडक दिल्याने एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
नवी मुंबईतील पाम बीचवर अल्पवयीन मुलाचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे अपघातानंतर तातडीने मदत न मिळाले त्याचा तडफडत मृत्यू झाला आहे. रक्तबंबाळ अवस्थेत तो अर्धा तास रस्त्यावर पडून होता. मिळालेल्या माहितीनुसार एका भरधाव अज्ञात वाहनाने स्कूटीस्वार 16 वर्षीय मुलाला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यानुसार नेरुळ पोलिसांनी मृत अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वाहनाच्या धडकेनंतर जखमी तरुणाला सोडून तो वाहनधारक पसार झाला. त्यानंतर स्थानिकांनी त्याला तातडीने आरोग्यासेवा मिळावी म्हणून 108 क्रमांकावर रुग्णवाहिका आणि 112 क्रमांकावर पोलिसांना संपर्क केला. मात्र तब्बल अर्धा तास प्रतीक्षा करूनही रुग्णवाहिका न पोहोचल्यामुळे त्या अल्पवयीन मुलाचा रस्त्यावर तडफडत मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट आहे.
हेसुद्धा वाचा - समृद्धी महामार्गावरील अपघातात महिंद्राची MPV चक्काचूर, ड्रायव्हरला डुलकी लागली अन् डोळ्यादेखत 2 लेकीसमोर वडिलांनी सोडला प्राण
नवी मुंबईतील आरोग्य सुविधेच्या दुरावस्थेवर स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, हा तरुण अर्धा तासापासून घटनास्थळावर तडफडत पडून होता, त्याला वेळेवर मदत मिळाली असती तर आज तो जिवंत असता.
प्रत्यक्षदर्शी पुढे म्हणाले की, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रुग्णवाहिका बोलावण्याचे प्रयत्न केलं. मात्र तरुणाचा मृत्यू झाल्यानंतरच रुग्णवाहिका दाखल झाली, त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या भयंकर घटनेचा नवी मुंबईकरांकडून निषेध व्यक्त करण्यात येतो. मनमानी करणाऱ्या रुग्णवाहिका युनियन आणि संबंधित चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांडून करण्यात येत आहे.