ऑपरेशन टायगर 3.0 ची तयारी... कोकणात राजकीय भूकंप अटळ? ठाकरेंना शिंदेंचा तिसरा धक्का? 'योग्य वेळी योग्य...'; 'तो' नेता कोण?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाने एकदा नाही तर दोन वेळा यशस्वीपणे ऑपरेशन टायगर राबवलं असून आता तिसऱ्या टप्प्याच्या तयारी सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 6 खासदार आणि त्यानंतर सचिन अहिर यांच्यासंदर्भात राबवलेल्या ऑपरेशन टायगरचा पुढचा अंक लवकरच महाराष्ट्रात दिसू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यंदा हे ऑपरेशन कोकणाच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण करू शकतं. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या ऑपरेशनसंदर्भातील संकेत दिले असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा एक बडा नेता शिंदेंच्या गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उदय सामंत नेमकं काय म्हणालेत? हा बडा नेता कोण? नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊयात...
ऑपरेशन टायगर 3.0 ची चर्चा
'ऑपरेशन टायगर'च्या तिसऱ्या टप्प्याची महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू असतानाच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हे ऑपरेशन नक्कीच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यापूर्वी दोन वेळा ऑपरेशन टायगर यशस्वी झाले असून आता तिसऱ्यांदा देखील 'ऑपरेशन टायगर' राबवले जाणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींचा दाखला देताना आधीच्या दोन वेळेप्रमाणे यंदाही हे ऑपरेशन निश्चितपणे यशस्वी होईल असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्याची तारीख आणि वेळ आत्ताच जाहीर केली जाणार नाही असंही उद्योग मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
कोणत्या नेत्याची चर्चा अन् का?
आता सामंत एवढ्या विश्वासाने ऑपरेशन टायगर 3.0 यशस्वी होईल असं सांगत असतानाच नेमक्या कोणत्या नेत्याला आता शिंदे पक्षात घेणार याबद्दल उत्सुकता आहे. मात्र या साऱ्या गोंधळादरम्यान, कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचा बुलंद आवाज आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांचं नाव याच ऑपरेशन टायगर 3.0 च्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहे. चिपळूण नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन सोहळ्यानिमित्त भास्कर जाधव यांची नुकतीच उदय सामंत यांच्याशी भेट झाली. अशातच सामंतच ऑपरेशन टायगरबाबत आशावादी असल्याने पडद्यामागे नेमकं चाललंय काय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
मंचावरूनच सूचक विधान
एका कार्यक्रमात मंचावर भास्कर जाधव उपस्थित असताना, "भास्कर जाधव हे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील," असे सूचक विधान उदय सामंत यांनी केले आहे. यापूर्वीही जाधव यांच्यासारखा ज्येष्ठ नेता मार्गदर्शनासाठी आल्यास स्वागतच असेल असे सामंत म्हणाले होते. सार्वजनिक कार्यक्रमात हे दोन नेते एकत्र आले होते.
पोटात दुखण्याचं कारण काय?
भास्कर जाधव आणि उदय सामंत एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आल्याचं दिसत आहे. दोन्ही नेत्यांमधील वाढत्या जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. याच कार्यक्रमानंतर भास्कर जाधवांसोबत स्टेज शेअर करण्यासंदर्भात विचारलं असता उदय सामंत यांनी, एकत्र कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने इतरांच्या पोटात दुखण्याचे कारण काय? असा सवाल केला आहे. तसेच भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते असल्याचा उल्लेख यावेळी सामंतांनी आवर्जून केला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात बोलताना उदय सामंतांनी, "भास्कर जाधव हे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील," असं सूचक विधान केल्याने भास्कर जाधव ठाकरेंना धक्का देणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
यापूर्वीही केलंय असं विधान
विशेष म्हणजे सामंत यांनी भास्कर जाधवांना आपल्या बाजूने यावं असं सूचक पद्धतीने सांगण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही भास्कर जाधवांसारखा नेता मार्गदर्शनासाठी येणार असेल तर आपण त्याचे स्वागतच करू असं सामंत म्हणाले आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या भास्कर जाधव यांनी योग्य वेळी निर्णय घेतल्यास त्याबाबत आपली भूमिका काय? या प्रश्नावर बोलण्यास मात्र सामंत यांनी नकार दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.