शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे ठाण्याचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास जसाजसा पुढे जातोय, धक्कादायक खुलासे होत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करण्यासाठी वापरलेली दोन्ही देशी पिस्तुले ही उत्तर प्रदेशातून खरेदी केली गेली होती. तर हल्ल्यासाठी वापरलेले चॉपर मुंबईतील चोरबाजारातून खरेदी करण्यात आलं होतं, असा खुलासा झाला आहे.
या तीन चॉपरची एकूण किंमत 200 ते 250 रुपये असल्याची माहिती आरोपींनी तपासादरम्यान समोर आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, ही शस्त्र खरेदीसाठी पैसा कोठून आणि कोणी उपलब्ध करून दिला, हे देखील लवकरच तपासात समोर येणार आहे. दरम्यान पोलिसांनी सांगितलं की, अद्याप एक चॉपर जप्त करणे बाकी आहे.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात समोर आलेल्या 'त्या' दोन व्हिडीओनंतर पोलिसांचा तपास पुणे जिल्ह्यातील मुळशीच्या दिशेने सरकण्याची चिन्हे आहेत. संबधित व्हिडीओ जुने असल्याचे सांगितले जात असले तरी पोलीस पथक मुळशीमध्ये जाऊन चौकशी करण्याची शक्यता आहे.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात शुक्रवारी सातव्यांदा राजेंद्र शिंदे यांची पोलिसांनी दिवसभर चौकशी केली. सकाळी सुरू झालेली चौकशी संध्याकाळी त्यांना सोडण्यात आलं. माजी नगरसेविका मीनाश्री शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्याशी संबंधित दोन व्हिडीओ राम प्रदीप पूर्णेकरांनी समोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यातील एका व्हिडीओमध्ये आरोपी निखिल यादव हा बंदूक चालवत आहे. तर, त्याच्या बाजूला राजेंद्र शिंदे उभे असल्याचे दिसून येते. हा व्हिडीओ मुळशी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष तपास पथकाच्या हाती संबंधित व्हिडीओ लागले अनुषंगाने पोलिसांकडून मुळशीमध्ये चौकशी केली जाण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, संतोष कनोजिया आणि अमित सिंग या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत आज शनिवारी संपत आहे. त्यामुळे या दोघांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.