ठाणे शहरातील डेटा सेंटर आणि रिंग मेट्रोचा फेरविचार करा, आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
Thane News : ठाण्यात अॅमेझॉन एआय डेटा सेंटरसह रिंग मेट्रो आणि पॉड ट्रान्सपोर्ट प्रकल्प राबवले जाणार आहेत. मात्र हे प्रकल्प राबवत असताना पर्यावरणीय परिणामांचा आणि नागरी परिणामांचा विचार करावा यासाठी शिवसेना उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे.
Thane News : ठाणे शहरातील प्रस्तावित अॅमेझॉन एआय डेटा सेंटरसह रिंग मेट्रो आणि पॉड ट्रान्सपोर्ट प्रकल्प राबवताना पर्यावरणीय परिणामांचा आणि नागरी परिणामांचा फेरविचार करावा अशी मागणी शिवसेना उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. आदित्य यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना या संदर्भातील पत्र पाठवलं असून यामाध्यमातून प्रकल्पाबाबतीत स्वतंत्र पर्यावरणीय आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्याची तसेच नागरिकांच्या सहभागातून पारदर्शक प्रक्रिया राबविण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. ठाण्यातील र्यावरणीय, नागरी आणि पायाभूत सुविधांवर दीर्घकालीन परिणाम करणारे प्रकल्प अजून प्रस्तावित आहेत त्यामुळे या प्रकल्पांबाबत निविदा प्रक्रिया पुढे नेण्यापूर्वी त्यांचे सर्वंकष मूल्यमापन होणे आवश्यक असल्याचे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
डेटा सेंटरबाबत काय आक्षेप :
ठाण्यातील बाळकूम येथे प्रस्तावित असलेल्या अॅमेझॉन एआय डेटा सेंटरमुळे पाणी, वीज, वाहतूक, ध्वनी, उष्णता, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर जाणाऱ्या संभाव्य परिणामांचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी आपल्या पात्रातून मुख्यमंत्र्यांना केली आहे. ठाणे शहरावर यापूर्वीच पाणी, वाहतूक आणि पायाभूत सुविधांचा ताण आहे. त्यामुळे डेटा सेंटरसाठी पर्यावरणीय आणि पायाभूत सुविधा सक्षम असलेल्या अन्य योग्य ठिकाणाचा पर्याय गांभीर्याने तपासावा असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.
5 हजार झाड तोडणार?
ठाण्यातील प्रस्तावित रिंग मेट्रो आणि पॉड ट्रान्सपोर्ट प्रकल्पांमुळे सुमारे पाच हजार झाडे, कांदळवन आणि पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतुकीला विरोध नसून पर्यावरणीय हानी टाळून अधिक परिणामकारक वाहतूक नियोजन करण्याची गरज असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. मेट्रो 4 आणि मेट्रो 5 या प्रकल्पांना प्राधान्याने पूर्ण करून सध्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी. त्यानंतरच अतिरिक्त वाहतूक प्रकल्पांची आवश्यकता आणि पर्यावरणीय परिणामांचा फेरविचार करावा, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली आहे.
नागरिकांना विश्वासात घेऊन मतं जाणून घ्या :
ठाण्यात होणाऱ्या सदर प्रकल्पांबाबत नागरिकांच्या अनेक हरकती, सूचना आणि तक्रारी जाणून घ्या असे देखील आदित्य ठाकरे यांनी पत्रातून सांगितलं आहे. पाणी, पर्यावरण, वाहतूक, सार्वजनिक आरोग्य, वीज आणि पायाभूत सुविधांवरील परिणामांचे स्वतंत्र आणि सर्वकष मूल्यांकन सार्वजनिक करावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.