वडिलांचा शिवसेनेत प्रवेश! मुंब्रा हिरवा करण्याचं आवाहन करणारी सहर म्हणाली, ‘शिवसेना फक्त हिंदुत्ववाद्यांना...’; 'शिवसेना, MIM एकत्र येतायेत तर...'
सहर शेख यांचे वडील युनूस इक्बाल शेखहे मुंब्रा परिसरात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्ती म्हणून ओळखले जातेत. ते जितेंद्र आव्हाड यांचे पूर्वीचे सहकारी असले तरी त्यांची मुलगी एमआयएमची नगरसेविका असताना त्यांची शिंदेंच्या शिवसेनेकडून एका महत्त्वाच्या पदावर नेमणूक झाली आहे.
ठाणे महापालिकेमधील प्रभाग क्रमांक 30 मधील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा आहे. एक फोटो व्हायरल झाल्यानंतर ही बातमी समोर आली. या फोटोमध्ये युनूस शेख शिवसेना नेत्यांसोबत असून, त्यांच्या गळ्यातही शिवसेनेचा भगवा गमछा दिसत आहे. अखिल भारतीय भारतीय केबल सेनेच्या कळवा मुंब्रा अध्यक्षपदी आपली निवड झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या विषयावरुन जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच आता 'मुंब्रा हिरवा करु' म्हणणाऱ्या सहर शेख यांनी वडिलांच्या या निर्णयावर भाष्य केलं आहे.
युनूस शेख यांना कोणत्या पदावर करण्यात आलं नियुक्त?
शिंदेंच्या पक्षांकडून युनूस शेख यांना मानाचं स्थान देण्यात आलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून युनूस यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात शिंदेंच्या आदेशानुसार, शिवसेना अखिल भारतीय केबल सेना अध्यक्ष कळवा-मुंब्रा विधानसभा नियुक्ती करण्यात आल्याचा उल्लेख आहे. ही नियुक्ती एका वर्षासाठी करण्यात आली आहे. वंदनीय हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. यावेळी त्यांनी प्रत्येक महिन्याच्या कामाचा लेखी अहवाल बाळासाहेब भवन कार्यालयात सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
टीका करणाऱ्यांना इशारा...
"वडिलांचे अभिनंदन करते मी. केबल हा आमचा खानदानी व्यवसाय आहे. ते आधीपासून त्या संघटनेवर आहेत. मला यात काही गैर वाटत नाही. लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्याला मी काही करु शकत नाही," असं सहर शेख यांनी म्हटलं आहे. एवढ्यावरच न थांबता यावरुन टीका करणाऱ्यांनाही त्यांनी इशारा दिला आहे. "टीकाकारांना योग्य वेळी उत्तर मिळेल," असं सहर शेख म्हणाल्यात.
शिवसेना आणि एमआयएम एकत्र येऊन काम केलं तर...
पुढे बोलताना सहर शेख यांनी शिवसेना आणि एमआयएम एकत्र येऊन काम करण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. "शिवसेना फक्त हिंदुत्ववाद्यांना एकत्र घेवून चालत नाही तर सर्वांना एकत्र घेवून चालणारा पक्ष आहे. शिवसेना आणि एमआयएम पक्ष एकत्र येतायेत तर तुम्हाला काय प्रॅाब्लेम आहे?" असा सवाल सहर शेख यांनी उपस्थित केला आहे.
शिंदेंशी आमचे कौटुंबिक संबंध
तसेच पुढे बोलताना, "एकनाथ शिंदे यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. वडील गेलेत त्या पक्षात मी गेलीये का? टिकाकारांना मी योग्य वेळी उत्तर देईन. जात प्रमाणत्र प्रकरण कोर्टात सुरु आहे. योग्य वेळेस मी उत्तर देईन. काही काम असेल तर मी एकनाथ शिंदे यांना भेटायला जाते," असंही सहर शेख म्हणाल्या.
भगवा आणि हिरवा दोन्ही...
मुंब्रा हिरवा करणार या विजयानंतरच्या घोषणेवरुन विचारलं असता, "भगवा आणि हिरवा दोन्ही करूयात. कैसे हराया मुव्हेमेंट परत एकदा जोरदार येणार आहे," असं सहर शेख यांनी म्हटलं आहे.
युनूस शेख हे याबद्दल काय म्हणाले होते?
युनूस शेख यांनी आपण शिवसेनेत प्रवेश केला असून, ही फक्त एक केबल ऑपरेटर्सची 40 वर्ष जुनी विंग असल्याचं सांगितलं आहे. "माझा केबल आणि इंटरनेटचा व्यवसाय आहे. अखिल भारतीय केबल सेनेत यात सर्व केबल ऑपरेटर्स आहेत आणि मीदेखील आहे. आता माझ्यावर कळवा-मुंब्रा विधानसभेचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. येथील सर्व केबल आणि इंटरनेट ऑपरेटर्सना एकत्र घेऊन मजबूत करायचं आहे," असं युनूस शेख यांनी म्हटलं आहे. "माझ्या मुलीने पक्ष वाढवण्यासाठी मुंब्रा हिरवा करु म्हटलं होतं. मग हिरवा करु, ठाणे आला तर भगवा करु," असंही ते म्हणाले. जर मला पक्षप्रवेश करायचाच असेल तर एकनाथ शिंदेंच्या हातूनच नियुक्तीपत्र घेऊ असंही त्यांनी विधान केलं आहे.