ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पूर्वेकडील पिसवली परिसरातून अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. पत्नीसोबत वडिलांचं अनैतिक संबंध असल्याचा संशयातून मुलाने वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या भयानक घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. मानपाडा पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी 11 ऑक्टोबरला सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली आहे. मारेकरी मुलगा आणि वडील हे बांधकाम मजूर म्हणून काम करतात. ही घटना घडली तेव्हा मारेकरीची पत्नी काही दिवसांपासून तिच्या गावी गेली होती. पतीला तिच्या वडील आणि पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरून अनेक वेळा त्यांचे वाद झाले. मुलगा या संशयामुळे अनेक दिवसांपासून मानसिक तणावात होता. शनिवारी रात्रीदेखील याच संशयातून त्यांच्यामध्ये वाद झाले होते.
त्यामुळे या संशयातून रविवारी सकाळी मुलाने वडिलांना झोपत असताना धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. मुलाच्या हल्ल्यानंतर त्यांच्या किंकाळ्याच्या आवाजाने शेजारी त्यांच्या घराकडे धावले. या हल्ल्यामुळे वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केला. त्यानंतर संशय आणि कौटुंबिक कलहातून हत्येचा गुन्हा दाखल करुन मुलीला अटक करण्यात आली आहे.