शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडातील आरोपी पप्या शिंदेला सोमवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी पुरवणी जबाबात ज्या दोन राजकीय व्यक्तींची नावे घेतली आहेत, त्यांच्या दिशेने चौकशी का होत नाही, असा सवाल पप्या शिंदेंचे वकील संग्राम शिंदे यांनी न्यायालयात उपस्थित केला.
पप्या शिंदेविरोधात यापूर्वी सात गुन्हे
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडप्रकरणी ठाणे पोलिसांनी पप्या शिंदे, निखील यादव आणि नितेश पवार या तिघांना अटक केली आहे. पप्या शिंदेची पोलीस कोठडी सोमवारी संपत असल्याने त्याला न्यायमूर्ती एस. बी. साबळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपास पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी पप्या शिंदेविरोधात यापूर्वी सात गुन्हे दाखल असल्याचे न्यायालयाला सांगितले. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. ही हत्या नियोजनपूर्वक आणि थंड डोक्याने करण्यात आली असून, त्यासंदर्भातील पुरावे गोळा करण्यासाठी पप्या शिंदेची आणखी नऊ दिवस पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा दुक्तिवाद साळवी यांनी केला.
पप्या शिंदेनेच आरोपीला पळून जाण्यास मदत केली
पूर्णेकर कुटुंबीयांच्या वतीने वकील समीर हाटले यांनी युक्तिवाद करताना, हत्येचे नियोजन सुमारे सहा महिन्यांपासून सुरू असल्याचा दावा केला. हत्येच्या सुमारे दहा दिवस आधी पप्या शिंदे आणि अन्य आरोपीमध्ये मोबाइलवरून सुमारे 150 वेळा संभाषण झाल्याचे कॉल डिटेल रेकॉर्डवरून (सीडीआर) समोर आले आहे. तसेच, अन्य आरोपींना घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी पप्या शिंदेने कार उपलब्ध करून दिल्याचा दावा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी न्यायालयात केला. या हत्येमागील नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, आरोपींनी कट रचून हा गुन्हा केला असून त्या कटाचा तपास करणे गरजेचे आहे, असे पोलिसांनी सांगितले. अटकेतील आणि फरार आरोपी घटनेच्या दिवशी मनोरमानगर, पवारनगर आणि एका मॉलमध्ये भेटल्याचेही तपासात पुढे आले आहे. दरम्यान, सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पप्या शिंदेला 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपास 'सीबीआय'कडे सोपविण्याची मागणी
पूर्णकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवावा, अशी मागणी आगरी समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. दहा जणांच्या शिष्टमंडळाने सोमवारी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. हत्येचा तपास कोणत्या दिशेने सुरू आहे, याबाबतही शिष्टमंडळाने विचारणा केली.