सायबर गुन्हेगारांपासून नेहमी सावध राहण्याचं आवाहन करणाऱ्या पोलिसांनाच लक्ष्य करत थेट पोलीस आयुक्तांचाच मोबाईल हॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचाच मोबाईल फोन हॅक झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. याचं कारण हॅक करणाऱ्याने त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला तब्बल 20 अश्लील व्हिडीओ शेअर करण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पोलीस आयुक्तांच्या मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरून अश्लील व्हिडिओ प्रसारित झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला हे स्टेटस डिलीटही करता येत नव्हते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखा आणि सायबर गुन्हे अन्वेषण कक्षाच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली होती. अखेर 6 वाजता हे स्टेटस डिलीट करण्यात यश आलं.
दुपारी 4 वाजून 46 मिनिटांनी हा प्रकार उघडकीस आला. आशुतोष डुंबरे यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला अश्लील व्हिडीओ दिसत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना शंका आली. हॅक करणाऱ्याने टप्प्याटप्प्याने काही मिनिटात 20 अश्लील व्हिडीओ स्टेटसला टाकले. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शंकेची पाल चुकचुकल्याने सर्व अधिकारी आणि कर्मचारी सतर्क झाले होते. सुरुवातीला हे स्टेटस डिलीट होत नसल्याने चिंता निर्माण झाली होती. पण अखेर सव्वा तासाने ते डिलीट झाले.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून सायबर सेलच्या माध्यमातून पुढील तपास सुरू आहे. अखेर पोलीस आयुक्तांचाच मोबाईल हॅक करणारे हे सायबर भामटे कोण? आणि या हॅकिंगमागे नेमकं काय कारण आहे? याचा तपास आता सायबर सेल करत आहे..