'भावनिक होऊन कुठलेही पाऊल...', उद्धव ठाकरेंनी घेतली प्रदीप पुर्णेकरांच्या कुटुंबाची भेट; म्हणाले 'सर्व आरोपींना फाशी...'
प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येतील दोषींना फासावर लटकवल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला
प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येतील दोषींना फासावर लटकवल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला.. उद्धव ठाकरेंनी पुर्णेकर कुटुंबियांनी भेट घेऊन सांत्वन केलंय. तर दुसरीकडे या हत्येनंतर आरोप प्रत्यारोपांची मालिकाही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. तर या प्रकरणात गुन्हे शाखेनं आणखी दोन जणांना गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय.
ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येचं घटनेनं संपूर्ण राज्य हादरल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणात पुर्णेकर कुटुंब आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. दरम्यान प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येतील दोषींना फासावर लटकवल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी पुर्णेकर कुटुंबियांनी भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी ठाकरेंसमोर पूर्णेकर कुटुंबाने आम्हाला न्याय मिळवून द्या, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. यावेळी ठाकरेंनी तुम्ही एकटे नाहीत, आम्ही सर्व तुमच्यासोबत असल्याचं सांगत पूर्णेकर कुटुंबाला धीर दिला.
आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी पुर्णेकर यांच्या कुटुंबाला दिले. तसेच आता जे काही कराल ते शांत डोक्याने करा, भावनिक होऊन कुठलेही पाऊल उचलू नका, असा सल्लाही त्यांनी पूर्णेकर यांचा मुलगा आणि भावाला दिला.
या प्रकरणात लवकरात लवकर गुन्हा दाखल झाली पाहिजे तसेच मिनाक्षी शिंदे यांच्या नावाचाही त्यात उल्लेख असावा. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या घटनेत लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करावे.प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची सखोल चौकशी करावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच काल संजय राऊत आल्यामुळे एफआयआरमध्ये त्यांचे नाव आले, आधी पोलीस एफआयआरमध्ये नाव घेत नव्हते, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान आज पुन्हा एकदा संजय राऊत यांना या प्रकरणावरून राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांच्यावर टीका केलीय. 'हत्येतील आरोपी आणि राजेंद्र शिंदेंची जवळीक आहे.. पुर्णेकरांच्या हत्येमागे स्थानिक राजकीय गट असल्याचा दावा राऊत यांनी केलाय.. तर राऊतांच्या या टीकेला शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय.
तर ठाण्याची अवस्था बीडपेक्षा वाईट झाल्याचं म्हणत संजय राऊत यांनी ठाण्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तर या हत्येतील सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी आणि मीनाक्षी शिंदे यांचं नगरसेवक पद रद्द करावं अशी मागणी प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नीने केलीय. एकनाथ शिंदेंनी मीनाक्षी शिंदेला मदत करू नये अशी विनंतीही यावेळी प्रदीप पुर्णेकरांच्या पत्नीने एकनाथ शिंदेंना केलीय.
दरम्यान प्रदीप पूर्णेकर प्रकरणात आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.... तसंच या प्रकरणातील काही धागेदोरे देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत...
प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यासह राज्याच्या राजकारणातही खळबळ उडालीय. तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे..या सगळ्यात आता मीनाक्षी शिंदे यांना अटक करून चौकशी करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेसह पूर्णेकर कुटुंबियांनी केलीय. दरम्यान या प्रकरणात आता आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आलेत. त्यामुळे या तीनही अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीतून आणखी काही नावं समोर येतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.