शरीरसंबंधांना नकार दिल्याने 19 वर्षीय रिसेप्शनिस्टला संपवलं; 4 वर्षानंतर होणार अभिनेत्रीची नार्को टेस्ट! ऑडिओ क्लिपमुळे आमदाराचं नाव चर्चेत
एका खाजगी रिसॉर्टमध्ये एका 'व्हीआयपी' पाहुण्याला 'विशेष सेवा' देण्यास सांगण्यात आलं होतं. म्हणजेच तिला शरीरसंबंध ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र तिने नकार दिल्यानंतर तिची हत्या करण्यात आली.
देशाच्या राजकीय वर्तुळामध्ये मागील दोन महिन्यांपासून चर्चेत असलेल्या उत्तराखंडमधील गाजलेल्या अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरणात आता एका अभिनेत्रीची नार्को चाचणी केली जाणार आहे. यासंदर्भातील आदेश विशेष सीबीआय न्यायालयाने दिले असून या नार्को चाचणीमधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील आठवड्यात 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने या अभिनेत्रीच्या नार्को चाचणीला परवानगी दिली आहे. ही अभिनेत्री आहे कोण आणि तिचं या साऱ्याशी काय कनेक्शन आहे जाणून घेऊयात...
ही अभिनेत्री कोण?
अंकिता भंडारी प्रकरणामध्ये डेहराडूनमधील विशेष सीबीआय कोर्टाने टीव्ही अभिनेत्री उर्मिला सनावर हिची नार्को-टेस्ट आणि पॉलीग्राफ टेस्ट घेण्याचे आदेश दिले आहेत. डिसेंबर 2025 मध्ये अभिनेत्री उर्मिला सनावरने काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. या संभाषणांमध्ये अंकिता भंडारी हत्याकांडाशी एका प्रभावशाली 'व्हीआयपी' म्हणजेच अती महत्त्वाच्या राजकीय नेत्याचा संबंध असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला होता. या ऑडिओ क्लिप्सची सत्यता तपासण्यासाठी सीबीआयने उर्मिलाची नार्को चाचणी करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
25 लाख आणि स्कॉर्पिओची ऑफर?
स्वत: उर्मिला सनावर हिने न्यायालयात दोन्ही चाचण्यांसाठी लेखी संमती दिली आहे. विशेष म्हणजे या चाचण्या गुजरातच्या गांधीनगर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये घेतल्या जाणार आहेत. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे याच आठवड्यात उर्मिलाची वैद्यकीय तपासणी होईल आणि त्यानंतर चाचणीची अंतिम तारीख निश्चित केली जाणार आहे. 13 तारखेला झालेल्या सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उर्मिला सनावरने अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. नार्को चाचणीला हजर न राहण्यासाठी मला 25 लाख रुपये आणि एक 'स्कॉर्पिओ' गाडी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते, असा दावा तिने केला आहे. याप्रकरणी तिने स्वामी दर्शन भारती उर्फ जीडीएस रावत यांचे नाव घेतले आहे.
त्या आमदाराचं नाव
सोशल मीडियावरील व्हायरल ऑडिओ उर्मिला सनावर आणि उत्तराखंडचे माजी आमदार सुरेश राठोड यांच्यातील संभाषणाचे असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी माजी आमदारांनीही नार्को आणि पॉलीग्राफ चाचणीसाठी तयारी दर्शवली होती. सध्या उर्मिला सनावर न्यायालयीन कोठडीत असून तिच्या जामीन अर्जावर 18 नोव्हेंबर 2026 रोजी सुनावणी होणार आहे
अंकिता भंडारी प्रकरण काय?
अंकिता भंडारी नावाच्या 19 वर्षीय रिसॉर्ट रिसेप्शनिस्टच्या हत्येचं हे प्रकरण आहे. अंकिताला सप्टेंबर 2022 मध्ये उत्तराखंडमधील ऋषिकेशजवळील एका खाजगी रिसॉर्टमध्ये एका 'व्हीआयपी' पाहुण्याला 'विशेष सेवा' देण्यास सांगण्यात आलं होतं. म्हणजेच तिला शरीरसंबंध ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र तिने याला दिल्याने तिची हत्या करण्यात आली होती. नुकतेच हे प्रकरण कथित 'व्हीआयपी'चा राजकीय संबंध, अंकिताच्या पालकांचे दिल्लीतील आंदोलनामुळे पुन्हा एकदा देशभरात चर्चेत आले आहे.
रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य (माजी भाजप नेते विनोद आर्य यांचा मुलगा) आणि त्याचे दोन सहकारी सौरभ भास्कर व अंकित गुप्ता हे अंकितावर रिसॉर्टमध्ये येणाऱ्या एका प्रभावशाली 'व्हीआयपी' पाहुण्याला अनैतिक सेवा देण्यासाठी दबाव टाकत होते. तिने याला ठाम नकार दिल्याने 18 सप्टेंबर 2022 रोजी तिची हत्या करून मृतदेह चीला कालव्यात फेकून देण्यात आला, जो 24 सप्टेंबर रोजी सापडला होता. काही काळापूर्वी व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये भाजप नेते दुष्यंत कुमार गौतम यांचे नाव समोर आले होते, ज्यांची ऑक्टोबर 2026 मध्ये सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. सीबीआयचा तपास पूर्ण होईपर्यंत ही नियुक्ती रद्द करावी आणि 'व्हीआयपी'चे सत्य समोर आणावे, या मागणीसाठी अंकिताच्या आई-वडिलांनी 15 ऑक्टोबर 2026 रोजी दिल्लीतील इंडिया गेटवर ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. त्यापूर्वी या प्रकरणाच्या जलद सुनावणीनंतर 30 मे 2025रोजी कोटद्वार येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी पुलकित आर्य, सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता या तिघांना दोषी ठरवत सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.