पश्चिम बंगालमध्ये कालीपूजेच्या मूर्ती विसर्जनावरून झालेल्या वादात भाजप नेते श्याम कुमार दास यांची मारहाण करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी दोन आरोपी अटकेत आहेत. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्याकडून कुटुंबाला 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली.
पश्चिम बंगालमध्ये कालीपूजेच्या मूर्ती विसर्जनानंतर घडलेल्या हिंसक घटनेत भाजपच्या एका स्थानिक नेत्याचा मृत्यू झाला. पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूरजवळील लावदोहा परिसरात ही घटना घडली. 35 वर्षीय श्याम कुमार दास ऊर्फ सायन दास असे मृत नेत्याचे नाव आहे. ते पांडवेश्वर विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या तीन क्रमांकाच्या मंडळाच्या ओबीसी मोर्चाचे महासचिव होते. विसर्जन मिरवणुकीवरून परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यातच त्यांना मृत्यू झाला.
स्थानिक प्रत्यक्षदर्शी आणि मित्र रंजय यांनी या घटनेची माहिती दिली. विसर्जनावरून परतताना सायन यांच्या मित्रावर काही जणांनी हल्ला केला. त्यांच्या हाताला दुखापत झाली. ही घटना समजल्यानंतर सायन घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी काही तरुणांनी लोखंडी रॉड घेऊन त्यांचा पाठलाग केल्याचे मित्रांनी सांगितले. या हल्ल्यात सायन गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यामागे जमिनीच्या जुना वाद कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.
या प्रकरणी पोलिसांनी विजय नंदी आणि प्रसून पांडे या दोन संशयितांना अटक केली आहे. गुरुवारी दोघांना दुर्गापूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेत सहभागी असल्याचा संशय असलेल्या अजय नावाच्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. मृत सायन यांचे वडील परिमल दास यांनी फरीदपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मृताच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. ही रक्कम मुख्यमंत्री मदत निधीतून देण्यात येणार आहे. तसेच सायन यांच्या पत्नीने नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केल्यास राज्य सरकारमध्ये कंत्राटी तत्त्वावर नोकरी देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपच्या स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली होती.
सायन यांचे वडील परिमल दास यांनी हत्येत सहभागी असलेले सर्वजण तृणमूल काँग्रेसशी संबंधित असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केलीय. असे असले तरी पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.