सीजेपी पत्रकार परिषद : दिल्लीत सीजेपीच्या पत्रकार परिषदेत तुफान राडा झाला. नेहा बोरा आणि अभिजीत दिपके बोलत असताना काही पत्रकारांनी अचानक प्रश्न विचारल्यानं मोठा गोंधळ झाला. उपस्थित पत्रकारांनी सीजेपीच्या नेत्यांचं संबोधन पूर्ण होऊ द्या नंतर प्रश्न विचारा असं समजावून सांगितलं तरी पत्रकारांचे प्रश्न सुरूच होते. या गोंधळानंतर सदर रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकारांना प्रेस क्लबमधून बाहेर काढण्यात आले. या पत्राकार परिषदेत नेहा बोरा आणि अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. मोदी सरकारा ज्ञानेश कुमार यांचा बचाव करत असल्याचा गंभीर आरोप केला.
दिल्लीच्या रस्त्यांवर सर्वसामान्यांना फरफटत नेण्यात आले. मात्र, आमचे आंदोलन थांबणार नाही असा निर्धार नेहा बोरा यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेत अभिजीत दिपके देखील चांगलेच आक्रमक झाले. एका ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी ममता बॅनर्जी, विद्यार्थी आणि अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आले. ज्ञानेश कुमार यांच्यासाठी एवढा मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला. संपूर्ण दिल्ली ठप्प करण्याची तयारी आहे. ज्ञानेश कुमार यांच्यासाठी असं काय केलं जात आहे? जंतरमंतरवर सौरभ आणि आशुतोष गेले, तेव्हा त्यांना तिरंगा फडकवण्यापासून रोखण्यात आले. ज्ञानेश कुमार यांच्यासाठी एवढा बंदोबस्त का? त्यांना इतकं महत्त्व का दिलं जात आहे? असे प्रश्न अभिजीत दिपके यांनी उपस्थित केले.
13 कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. हा सगळा संगनमताचा प्रकार नसेल, तर दुसरं काय आहे? बंगळुरूमध्ये मला असे लोक भेटले, ज्यांना जिवंत असूनही मृत घोषित करण्यात आले होते. ज्ञानेश कुमार यांनी त्यांना मृत घोषित केले. अखेर असं का? मोदींमध्ये आणीबाणी लागू करण्याचीही हिंमत नाही. अधिकृतपणे आणीबाणी जाहीर करून टाका! पण त्यांना जनतेच्या प्रतिमेची भीती वाटते. परदेशात लोक काय म्हणतील, याची त्यांना चिंता आहे. तिरंगा फडकवण्याला कायद्याचे उल्लंघन म्हटले जात आहे.
‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही केवळ एक घोषणा होती. खरा उद्देश आहे ‘एक देश, एक पक्ष; एक देश, एकच पक्ष!’ सरकारमध्ये बसलेल्या लोकांना आधीपासूनच तिरंग्याची अडचण आहे. यांच्यापैकी कुणाचाही नेता स्वातंत्र्यलढ्यात नव्हता. त्यांच्या शाखांमध्ये कधीही तिरंगा फडकवला जात नव्हता. नरेंद्र मोदी कितीही प्रयत्न करू देत, त्यांची महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्या बरोबरीने उभे राहण्याची पात्रता नाही असा घणाघात अभिजीत दिपके यांनी केला. आम्ही सर्वजण तिरंगा घेऊन जाणार. त्यानंतरही पोलीस असंच वागतात का, ते पाहू. आम्ही थांबणार नाही असं ऐशा घोष म्हणाले.