'एका परदेशी स्त्रीच्या येण्याने एकामागोमाग मृत्यू...; गांधी कुटुंबाच्या 'त्या' व्हिडीओवरुन कंगनाची सोनिया गांधींवर टीका, इंदिरा गांधी-मनेकांकडे वेधलं लक्ष
अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने गांधी कुटुंबात सोनिया गांधींचं महत्त्व ज्याप्रकारे वाढत गेलं त्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. गांधी कुटुंबाच्या एका जुन्या व्हिडीओच्या आधारे तिने काही मुद्दे उपस्थित केले आहेत.
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने गांधी कुटुंबाच्या भूतकाळावर भाष्य करत एक नवा वाद निर्माण केला आहे. सोनिया गांधींच्या राजकीय घराण्यात प्रवेश करण्यावरुन तिने प्रश्न उपस्थित केला आहे. तसंच गांधी कुटुंबातील प्रमुख सदस्यांशी संबंधित घटनाक्रमाचा उल्लेख करताना ही अतिशय योगायोगांची मालिका असल्याचं म्हटलं आहे. गांधी कुटुंबातील 1981 च्या सुमारासचा घरातील व्हिडिओ समोर आल्यानंतर कंगनाने त्यावर भाष्य करत टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये इंदिरा गांधी, सोनिया गांधी, मनेका गांधी आणि बालपणीचे राहुल व प्रियांका गांधी एकत्रित जेवताना दिसत आहेत.
योगायोगाने, सोनिया गांधींचे 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' (Belonging: A Journey of Love) हे पुस्तक प्रकाशित झाले असतानाच कंगनाने हे विधान केलं आहे. व्हिडीओत दिसत आहे की, अमेठी पोटनिवडणुकीत राजीव गांधी आघाडीवर असल्याची माहिती देणारा एक फोन कॉल येतो, ज्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चा सुरु होते आणि इंदिरा गांधींच्या चेहऱ्यावर प्रतिक्रिया उमटते. मात्र, ज्या युजरने ही क्लिप शेअर केली आहे त्याने सर्वांचे लक्ष मनेका गांधींकडे वेधले. त्यादेखील यावेळी तिथे उपस्थित असतात. या व्हिडीओत संजय गांधींच्या पत्नी मनेका गांधी कुटुंबाच्या या आनंदोत्सवापासून काहीशा अलिप्त असल्याचे दिसून येते.
सोबतच्या पोस्टमध्ये निवडणुकीच्या निकालांनंतरची इंदिरा गांधींची प्रतिक्रिया आणि टेबलावर मनेका ज्या ठिकाणी बसल्या होत्या, त्यातील विरोधाभास याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात असंही नमूद केलं आहे की, या घटनेच्या सुमारे एक वर्ष आधीच संजय गांधींचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. व्हिडिओमध्ये त्या क्षणी, मनेका यांच्याकडे कोणीही पाहिले नाही किंवा त्यांच्याशी संवाद साधला नाही, असा दावा त्यात करण्यात आला आहे.
कंगनानेही हाच धागा पकडत टीका केली असून, मनेका यांच्या या एकाकीपणाला दु:खद म्हटलं आहे. मनेका कदाचित आपल्या सासूकडून सांत्वनाची अपेक्षा करत होत्या, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असं तिने म्हटलं आहे.
“क्लिपच्या शेवटीही, जेव्हा सगळे निघून जातात, तेव्हा मनेका तिथेच थांबतात. त्या इंदिरा गांधींकडे एखाद्या जखमी लहान मुलाप्रमाणे ज्याला थोडासा दिलासा, एखादं स्मितहास्य किंवा एखादी नजर मिळेल या आशेने पाहत आहे," असं कंगनाने म्हटलं आहे. तिने असा प्रश्नही उपस्थित केला की, सोनिया गांधी गांधी कुटुंबाच्या इतक्या जवळ कशा आल्या? तिने परदेशातील एका कॅफेमध्ये सोनिया गांधींची राजीव गांधींशी झालेली भेट याचाही उल्लेख केला.
कंगनाने गांधी कुटुंबाच्या राजकीय इतिहासावर विचारले प्रश्न
कंगनाने संजय गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मृत्यूचा उल्लेख करत हा घटनाकम्र सोनिया गांधींच्या काँग्रेसमध्ये महत्त्वाचा मार्ग मोकळा करणारा ठरल्याचं म्हटलं.
कंगनाची पोस्ट
क्लिपच्या शेवटी सुद्धा सगळे निघून जातात, पण मनेका मिसेस गांधींकडे एका जखमी लहान मुलासारख्या पाहत राहतात, जणू काही त्यांना त्यांच्याकडून एका लहान स्मितहास्याचा किंवा नजरेचा दिलासा हवा आहे. त्या एका संकेताच्या आशेने तिथेच थांबतात, पण काहीच मिळत नाही, फक्त कोरडेपणा दिसतो आणि हळूहळू त्या अशा नाहीशा होतात, जणू त्या तिथे आहेत पण त्यांचे अस्तित्वच नाही. हृदयद्रावक!
दुसरीकडे, प्रत्येकजण एका रहस्यमय परदेशी नागरिकाच्या हातातील बाहुली बनलेला दिसतो, जी मोठा मुलगा राजीव गांधीला परदेशात एका कॅफेमध्ये भेटते आणि तेव्हापासून ते अविभाज्य झाले. धाकटे चिरंजीव संजय मिसेस गांधींकडून औपचारिक प्रशिक्षण घेत होते, पण त्यांचा रहस्यमयरीत्या मृत्यू होतो आणि त्यांची निराधार तरुण विधवा मनेका यांना काहीही कारण नसताना घरातून हाकलून दिले जाते आणि त्यानंतर लगेचच सासू आणि पती यांचीही एकामागून एक हत्या होते. आणि मग रहस्यमय परदेशी सोनिया गांधी सरकारप्रमुख म्हणून उरतात, व्वा!! किती सोयीस्कर!!
जून 1980 मध्ये संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर राजीव गांधींनी राजकारणात प्रवेश केला आणि 1981 मध्ये अमेठी पोटनिवडणूक जिंकली. इंदिरा गांधींशी मतभेद झाल्यानंतर मनेका गांधी यांनी 1982 मध्ये कुटुंब सोडले. ऑक्टोबर 1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली, तर मे 1991 मध्ये तामिळनाडूमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान राजीव गांधी आत्मघातकी बॉम्बस्फोटात मारले गेले.
कंगनाने सोनिया गांधींचे वर्णन "रहस्यमय परदेशी नागरिक" म्हणून केले आणि त्यांच्या इतर प्रमुख सदस्यांच्या मृत्यूनंतर गांधी कुटुंबातील मध्यवर्ती व्यक्ती बनल्या त्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी तिने कोणताही पुरावा दिलेला नसून, फक्त शंका उपस्थित केल्या आहेत.