काँग्रेसमध्ये प्रियांका विरुद्ध राहुल? रेहान वाड्रा यांच्या प्रदर्शनावरील वादादरम्यान दोघांत अंतर्गत मतभेद? भाजपाचा दावा, शेअर केले स्क्रिनशॉट्स
भाजपा प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी प्रियंका गांधींचा राहुल गांधींवरील विश्वास उडाला आहे का? अशी विचारणा केली आहे. वादाच्या जोरावर प्रियंका गांधी आपला आपल्या मुलाचं सॉफ्ट लाँचिंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
काँग्रेसमध्ये राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी वाड्रा यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचा दावा भाजपाने केला आहे. भाचा रेहान वाड्रा याच्या प्रदर्शनातील फोटो हटवल्यानंतरही राहुल गांधींनी मौन बाळगले असल्याचे सांगत भाजपाने हा दावा केला आहे. प्रियंका यांचा आपल्या भावावरचा विश्वास उडाला आहे का? अशी विचारणा भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी केली आहे. त्यांनी असा आरोपही केला की, प्रियांका एक वाद निर्माण करत आपल्या मुलाचं (रेहान वाड्रा) राजकारणात 'सॉफ्ट-लाँचिंग' करण्याचा प्रयत्न करत आहेत.
राहुल गांधींनी या संपूर्ण वादावर अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपने यावरुन प्रश्न उपस्थित करत गांधी भावंडांमध्ये फूट असल्याचा आरोप केला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच राहुल आणि प्रियांका यांनी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात, कथित 'एसआयआर' (SIR) अनियमिततेच्या मुद्द्यावरून एकत्रितपणे निदर्शने केली होती.
"प्रियांका यांनी एक वाद निर्माण करून आपल्या मुलाला राजकारणात हळूच आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा राहुल गांधींवरील राजकीय विश्वास उडाला आहे!" अशी पोस्ट भंडारी यांनी केली आहे. त्यांनी पुढे म्हटले, "व्हिएतनाममध्ये असूनही प्रत्येक विषयावर पोस्ट करणारे राहुल गांधी यांनी आतापर्यंत रेहान वाड्रा यांच्या समर्थनार्थ एकही उघड पोस्ट केलेली नाही. काँग्रेसमध्ये आता प्रियांका विरुद्ध राहुल असा संघर्ष सुरू आहे!".
रेहान वाड्रा यांच्या प्रदर्शनावरून वाद का निर्माण झाला आहे?
बुधवारी, कलाकार आणि छायाचित्रकार रेहान याच्या प्रदर्शनातील दिल्ली आंदोलनाचे फोटो हटवण्यात आले. त्याने सांगितले की, 'नो आयडिया इज फायनल' (No Idea is Final) या शीर्षकाने आयोजित केलेल्या त्याच्या प्रदर्शनापूर्वी, बिकानेर हाऊस प्रशासनाने दिल्लीतील अलीकडील विद्यार्थी आंदोलनांचे चित्रण करणारे त्याचे अनेक फोटो काढून टाकले आहेत. या घटनेवर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली असून, प्रियांका गांधी यांनी तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली आहे.
बुधवारी संध्याकाळी प्रदर्शन सुरू होण्याच्या काही तास आधी, बिकानेर हाऊस व्यवस्थापनाने त्यांना 105 पैकी 74 फोटो काढून टाकण्यास किंवा बदलण्यास सांगितले. जेव्हा प्रदर्शन सुरू झाले, तेव्हा तिथे केवळ 35 छायाचित्रे शिल्लक होती असे त्याने सांगितले.
आपण एक आठवडाआधीच प्रदर्शनाची मांडणी कशी असेल याची माहिती बिकानेर हाऊससोबत शेअर केली होती आणि त्यांना त्याबाबत संमतीही मिळाली होती असेही त्याने सांगितले आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना बिकानेर हाऊसने म्हटले आहे की, ही छायाचित्रे त्यांच्या ठिकाणच्या धोरणांशी "सुसंगत नसल्याचे" आढळले.
भाजपाने शेअर केले ई-मेलचे स्क्रीनशॉट्स
रेहान आणि बिकानेर हाऊस यांच्यातील ईमेल संवादाचे स्क्रीनशॉट्स शेअर करत, भाजपने म्हटले आहे की, प्रदर्शनाच्या सुरुवातीच्या प्रस्तावात निसर्ग, वन्यजीव, अमूर्त कलाकृती, व्यक्तिचित्रे आणि शिल्पे यांसारख्या विषयांचा उल्लेख होता. भंडारी यांच्या म्हणण्यानुसार, त्यात कोणत्याही राजकीय आशयाचा उल्लेख नव्हता.
भंडारी यांनी पोस्ट केले, "10 जून रोजी रायहान वाड्रा यांनी बिकानेर हाऊसकडे पाठवलेल्या ईमेलमध्ये आणि त्यासोबत जोडलेल्या प्रस्तावात, त्यांनी प्रदर्शनाचे विषय म्हणून निसर्ग, वन्यजीव, कलाकृती आणि शिल्पे यांचा उल्लेख केला होता." बिकानेर हाऊसने ३० जून रोजी हा प्रस्ताव स्वीकारला. भाजपने असा दावा केला आहे की, राजकीय छायाचित्रे नंतर जोडण्यात आली असावीत.
21 ऑक्टोबर रोजी बिकानेर हाऊसने रेहान यांना एक नोटीस पाठवून 74 फोटो काढून टाकण्यास सांगितले, कारण ती त्यांच्या धोरणांशी सुसंगत नव्हती. भंडारी म्हणाले, "रेहान यांना बुकिंगच्या नियमांची माहिती होती. म्हणूनच, ज्या प्रदर्शनाची संकल्पना त्यांनी 3 वर्षांपासून तयार केली होती, त्यात कोणतीही राजकीय सामग्री नव्हती."
ते पुढे म्हणाले, "राजकीय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी कुटुंबाकडून आलेल्या दबावामुळे, नंतर त्यात राजकीय छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली. यावर बिकानेर हाऊसने 21 ऑक्टोबर रोजी ती छायाचित्रे काढून टाकण्यास सांगितले." या घडामोडींमुळे प्रियांका वाड्रा आणि काँग्रेसचा खोटेपणा उघड झाला असल्याचा भाजपाचा दावा आहे.