केंद्र सरकारने मागील काही काळामध्ये रेल्वेसंदर्भात अनेक सुधारणा केल्या आहेत. रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाबरोबरच अनेक रेल्वे स्थानकांचा कायपालटही करण्यात आला आहे. यासाठी हजारो कोटी रुपये सरकाकडून खर्च करण्यात आले असून अनेक रेल्वे स्थानकांवर अगदी विमानतळासारख्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्यात. मात्र या सुविधांचा तितका वापर होतोय का आणि या स्थानकांची काळजी घेतली जातेय का असा प्रश्न उपस्थित करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
450 कोटी रुपये खर्च
व्हायरल झालेला हा व्हिडीओ मध्य प्रदेशमधील भोपाळ येथील कमलापति रेल्वे स्थानकावरील आहे. या रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी सरकारने नुकतेच 450 कोटी रुपये खर्च केले आहेत. या रेल्वे स्थानकामध्ये विमानतळालाही लाजवतील अशा सोयी आता आहेत. मात्र याच स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या समोर आला असून या रेल्व स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर चक्क म्हशी आरामात फिरत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय. विशेष म्हणजे कमलापति रेल्वे स्थानक हे भारतातील पहिले पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर आधारित जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक जर्मनीच्या हायडेलबर्ग स्थानकाच्या धर्तीवर डिझाइन केलेलं आहे. तिथेच आता प्लॅटफॉर्मवर म्हशी फिरताना दिसल्यात.
म्हशी इथं आल्याच कशा?
रेल्वे स्थानकावर म्हशी फिरताना पाहून अनेक प्रवाशांनाही आश्चर्य वाटलं असून या म्हशी इथपर्यंत आल्याच कशा असा सवाल उपस्थित केला जातोय. इंटरनेटवरही हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी एवढा खर्च केलेल्या रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर सोडलेली आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
Buffaloes spotted roaming at a ₹450 crore world class Rani Kamlapati Railway Station in Bhopal. https://t.co/ioN1YTVLoo
— Gems (@gemsofbabus_) October 7, 2026
मोदींच्या हस्ते झालंय या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन
कमलापति रेल्वे स्थानकाचा पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप धोरणानुसार विकास करण्यात आला असून नव्या इमारतीच्या बांधकामासाठी 100 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून येथील व्यावसायिक विकासासाठी (कमर्शियल डेव्हलपमेंटसाठी) 350 कोटी रुपये खर्च झाले आहेत. 15 नोव्हेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वे स्थानकातील नव्या सुविधांचं लोकार्पण करण्यात आलेलं. या रेल्वे स्थानकावर विमानतळासारख्या एअर-कॉन्कर्स, एस्केलेटर, लिफ्ट, फूड कोर्ट, एसी वेटिंग लाउंज, व्हीआयपी लाउंज, पार्किंग अशा सुविधा आहेत. त्यामुळेच येथे म्हशी दिसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.