Qualcomm Layoffs : अमेरिकन चिप कंपनी क्वालकॉमने मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. याचा मोठा फटका भारतातील कर्मचाऱ्यांना बसणार आहे. भारतातील 1000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. कर्मचारी कपातीचा पहिला टप्पा या आठवड्यात पार पडू शकतो. बंगळूरु येथील कार्यालयातील कर्मचारी आपली नोकरी गवामू शकतात. येत्या काळात भारतात ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ शकते.
भारतात क्वालकॉमचा मोठा व्यवसाय आहे. क्वालकॉमचे भारतात अंदाजे 20,000 कर्मचारी कार्यरत आहेत. क्वालकॉममध्ये जगभरात अंदाजे 52,000 कर्मचारी नोकरी करतात. अहवालानुसार, कंपनी जागतिक कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे 7 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. अंदाजे 3,600 कर्मचारी आपली नोकरी गमावू शकतात. क्वालकॉमचे भारतात अंदाजे 20,000 कर्मचारी असून, बंगळूर, हैदराबाद, दिल्ली एनसीआर आणि चेन्नई येथील कार्यालयांमध्ये हे कर्मचारी काम करतात.
अहवालानुसार, या पुनर्रचनेमुळे भारतातील सुमारे 1,000 नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. जानेवारी 2027 मध्ये कर्मचारी कपातीची दुसरी फेरी अपेक्षित आहे. फ्रेशर्स तसेच अनुभवी कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आहे. चीपची डिमांड कमी झाल्याने कंपनी इतर व्यवसायांमध्ये गुंतवणूक करत आहे. नव्या व्यवसायासाठी भांडवल उभारण्यासाठी कंपनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करत असल्याचे सांगितले जात आहे.
काही क्वालकॉम कर्मचाऱ्यांनी कर्मचारी कपातीनंतर सोशल मिडियावर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. विकास ऑलवेज नावाच्या एका युजरने 26 लाख पगाराची नोकरी एका झटक्यात कशी गमावली याचा अनुभव सांगितला आहे. त्याला क्वालकॉममध्ये कॅम्पस प्लेसमेंट मिळाली. मात्र, लेऑफचा फटका बसला आणि 26 लाख पगाराची नोकरी एका झटक्यात हातातून गेली.
नोकरीवरुन काढण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंदाजे तीन महिन्यांच्या पगाराएवढे सेवा समाप्ती पॅकेज मिळू शकते. याव्यतिरिक्त, काही कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत कार्यमुक्तीची कागदपत्रे सादर केल्यास, त्यांना अतिरिक्त एका महिन्याच्या पगाराची ऑफर देण्यात आल्याचेही वृत्त आहे.