'सुप्रियाताईंना सत्तेत जायचंय, हे केवळ सत्तेसाठी जन्माला आले आहेत, सत्ता घेऊन मरायचं एवढंच यांच्या डोक्यात आहे,' अशी जहाल टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांवर केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने डिलीमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या या निर्णयावरुन काँग्रेसने संताप व्यक्त करत शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीत या विषयावर भाष्य केलं आहे.
'मी सुप्रिया ताईंचा प्रवास पाहिला आहे. ते वारंवार बोललात की काँग्रेसवाले का चिडतात. आम्ही काहीच चिडणार नाहीत. भाजपच्या विमानात फिरले तरी आम्ही चिडणार नाही. पंतप्रधानांना चार-पाच वेळा भेटले तरी आम्ही चिडणार नाहीत. आम्हाला आनंद आहे. कुठेही जातील भाजपसोबत बसतील, चर्चा करतील, आम्हाला तर आनंद आहे. मला त्यावेळसच कळलं होतं. सुप्रिया सुळेंना सत्तेत जायचंय, मंत्री व्हायचं असेल, काय व्हायचं असेल. त्यामुळं यांना विचारच नाही. हे केवळ सत्तेसाठी जन्माला आले आहेत, सत्ता घेऊन मरायचं एवढंच यांच्या डोक्यात आहे. दोघेही बापलेक निर्णय़ घेतात, भाजपला साथ देण्याचा निर्णय घरात मिळून घेतला आहे, 'अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
'लोकशाही संपवण्यासाठी उचललेलं पाऊल असून अत्यंत घातक आणि दुर्दैवी असा निर्णय आहे. पवार साहेबांनी आयुष्यभर जो विचारांना घेऊन जगले. तोच विचार त्यांच्या उत्तरार्धातमध्ये पायदळी तुडवण्याचं काम करताहेत. याचा अर्थ उद्याच्या लोकशाहीची हत्या करणाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव घेतले जाईल. कारण या देशात 2029 नंतर निवडणुका होतीलच का? अशी परिस्थिती उद्भवली जाईल. हे डिलिमीटेशन मतदार संघाच्या पुनर्रचनेचा नाही तर हे लोकशाहीची हत्या कऱणारे विधेयक आहे. या विधेयकाला जो पाठिंबा देईल त्याचे नाव देशाच्या गद्दारीच्या यादीत येईल, असं माझं मत आहे,' असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
'लोकसभेत शरद पवार आमच्यासोबत नसते तर दोन खासदार पण निवडून आले नसते. राहुल गांधींनी यात्रा काढली. भारत जोडोच्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि या लोकांचा (भाजप) 405 चा नारा होता. तो केवळ संविधान बदलवण्यावासाठी आणि मनुस्मृतीवर देश चालवायचा ही त्याची भूमिका होती. पवार आमच्या सोबत आले म्हणून त्यांचे खासदार निवडून आले,' असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
'पक्ष फुटल्यानंतर व फुटायच्या अगोदर पवार साहेबांची भूमिका स्पष्ट होती. आम्ही भाजपसोबत जाणार नाही. पण आता आम्हाला इतिहास आठवतो. पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसायचा आहे. आणि पुन्हा एकदा पाठीत खंजीर खुपसण्याचे काम त्यांनी केलं आहे. जो बिलाला पाठिंबा देईल तो आमच्याबरोबर नसणार. हे बिलच देशविघातक आहे,' असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी पवारांवर जहरी टीका केली आहे.