शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने 'इंडिया' आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. काँग्रसेचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर थेट शरद पवारांवर निशाणा साधता अत्यंत कठोर शब्दांमध्ये राष्ट्रवादीवर टीका केली आहे. नवी दिल्लीमध्ये ओबीसी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सध्या डिलिमिटेशनसंदर्भातील राजकारणावर भाष्य केलं.
असे वाटले नव्हते
"पवार साहेबांचे वय 86 आहे. संपूर्ण आयुष्य पुरोगामी विचाराला धरून घालवले. असे नेते जातीवादी शक्तीसोबत जातील असे वाटले नव्हते. पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा आहे. हे देशाला माहिती आहे. सत्तेशिवाय जगणे या पक्षाला माहितीच नाही," अशा शेलक्या शब्दांमध्ये वडेट्टीवार यांनी शरद पवारांच्या पक्षाने घेतलेल्या निर्णयावरून निशाणा साधला आहे. एवढ्यावरच न थांबताना वडेट्टीवार यांनी याच वर्षी मार्च महिन्यात काँग्रेसने समर्थन देऊन शरद पवारांना राज्यसभेची जागा दिली होती अशी आठवणही करून दिली आहे.
यादीत शरद पवारांचे नाव येईल हे दुर्देव
"आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा देऊन राज्यसभेवर पाठवले. फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार पवारांच्या माध्यमातून जगाला पाहिजे अशी आमची भूमिका होती. पण लोकशाही संपविण्यात ज्यांचा वाटा राहील त्या यादीत शरद पवारांचे नाव येईल असे दुर्दैवाने वाटत आहे. हे हुकुमशाहीसाठी डिलिमिटेशन आहे असे आम्हाला वाटत आहे," असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
या लोकांना विचारच राहिला नाही
"कोणी म्हणत आहे पक्ष फुटणार आहे म्हणून पाठिंबा दिला. आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला तरी तुम्ही का फुटला? ते भाजपाच्या विमानात फिरले तरी आम्ही चिडणार नाही. ते भाजप सोबत गेले तरी आम्हाला आनंद आहे असे मी बोललो होतो. या लोकांना विचारच राहिला नाही," असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत...
त्यापूर्वीच महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या फेसबुक पोस्टवरुन शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना काँग्रेसच्या मदतीनेच शरद पवार राज्यसभेचे खासदार झाल्याची आठवण करुन दिली आहे. "शरद पवार साहेबांना वयाच्या 85 व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता… मार्च 2026 मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे 10 आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 36 मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे 16, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे 20 आमदार होते. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली. आणि आता काय? परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे ताई आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत," अशी पोस्ट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या फोटोंसहीत करण्यात आली आहे.