राहुल गांधींची निर्दोष मुक्तता, 8 वर्षांनी आला निर्णय! न्यायालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष, अमित शाहांशी संबंधित आहे प्रकरण
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संबंधित मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने राहुल गांधींची निर्दोष मुक्तता केली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एका जुन्या मानहानीच्या खटल्यात, विशेष न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. निकाल जाहीर झाला तेव्हा राहुल गांधी सुलतानपूरमधील न्यायालयात उपस्थित होते. या निर्णयामुळे त्यांच्या काँग्रेस कार्यकर्ते, समर्थकांमध्ये आनंदाची वातावरण असून, त्यांनी न्यायालयाबाहेर एकच जल्लोष केला. निकालानंतर राहुल गांधी दिल्लीकडे रवाना झाले.
हे प्रकरण नक्की काय आहे?
हे प्रकरण 20118च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या काळातील आहे. बंगळुरूमध्ये एका निवडणूक रॅलीदरम्यान, राहुल गांधी यांनी तत्कालीन भाजप अध्यक्ष आणि सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. आपल्या भाषणात त्यांनी सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणाचा उल्लेख केला होता. या विधानावरून भाजप नेते विजय मिश्रा यांनी सुलतानपूर येथील न्यायालयात राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.
कोर्टात आतापर्यंत काय घडलं?
या प्रकरणात, न्यायालयाने 27 नोव्हेंबर 2023 रोजी राहुल गांधींना समन्स बजावले होते. त्यानंतर, 20 फेब्रुवारी 2024 रोजी राहुल न्यायालयात हजर झाले आणि त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. 26 जुलै 2024 रोजी न्यायालयात त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. सुनावणीदरम्यान, राहुल गांधींनी सांगितले की, त्यांनी केलेली विधाने सद्भावनेने केली होती आणि कोणाचीही प्रतिमा मलीन करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर, न्यायालयाने निकाल देण्यासाठी आजची तारीख निश्चित केली होती.
दोन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद
ज्या कलमांतर्गत राहुल गांधींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यांत दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. विशेष म्हणजे, ज्या सोहराबुद्दीन प्रकरणाचा उल्लेख राहुल यांनी केला होता, त्या प्रकरणात 2014 मध्ये मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने अमित शहा यांची निर्दोष मुक्तता केली होती. राहुल गांधींचे वकील काशी प्रसाद शुक्ला यांनी न्यायालयाकडून न्याय मिळेल, असा पूर्ण विश्वास व्यक्त केला. त्यांच्या मते, राहुल यांच्या विधानांचा विपर्यास करण्यात आला होता. आज न्यायालयाचा निकाल आल्यानंतर, समर्थक आनंद व्यक्त करत आहेत.
2027 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. काँग्रेस पक्षाने याला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधींच्या ताफ्याचा अपघात
राहुल गांधी सुलतानपूरला जात असताना त्यांच्या ताफ्याचा अपघात झाला. पूर्वांचल एक्सप्रेसवेवर त्यांच्या ताफ्यातील काही वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात काही जणांना किरकोळ दुखापत झाली असूनराहुल गांधी पूर्णपणे सुरक्षित आहेत.