मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ शहरात एक विचित्र प्रकार घडला आहे. येथील शाहजहानाबादमधील एका 60 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आळी आहे. अवघ्या 500 रुपयांवरुन झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्यानंतर मृत महिलेचे दागिने शेजारच्या महिलेनेच पळवल्याचं समोर आलं आहे. वृद्ध महिलेची हत्या करण्यासाठी आरोपीने आधी तिचे तोंड आणि नाक दाबून धरले. श्वास न घेता आल्याने या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या अंगावरील दागिन्यांबरोबरच सोन्याचे दातही काढून घेत घटनास्थळावरुन महिला आरोपी फरार झाली. पोलिसांनी फरार महिला आरोपीला अटक केल्यानंतर हत्येचं गूढ उलगडलं आहे.
शवविच्छेदन केलं अन् गुन्हा दाखल झाला
मृत महिलेचं नाव कलरी देवी असं आहे. कलरी या शाहजहानाबाद पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मल्टी ए-2, बाजपेयी नगर येथील रहिवासी होत्या. त्या पती हरिचंद्र प्रजापतींसोबत राहत होत्या. 6 नोव्हेंबर रोजी कलरी यांचा हमीदिया रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांना हा मृत्यू नैसर्गिक नसल्याची शंका आल्याने शवविच्छेदन करण्यात आलं. शवविच्छेदन अहवालात गुदमरल्याने आणि श्वास कोंडल्याने कलरी यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणामध्ये हत्या आणि दरोड्याच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.
तपासात धक्कादायक माहिती समोर
पोलिसांनी तपास सुरु केला असता घटनेच्या दिवशी आरोपी रेखा उर्फ रीटा ही मयत महिलेच्या घरी आल्याची माहिती मिळाली. रेखा 500 रुपये मागण्यासाठी या वृद्ध महिलेच्या घरी आली होती. कलरी यांनी रेखाला 500 रुपये देण्यास नकार दिला. रेखा जेव्हा कलरी यांच्या घरी आली तेव्हा ती नशेत होती. त्यामुळेच पैसे न मिळाल्याने आणि दागिन्यांच्या लोभापायी, रेखाने कलरीचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर ती तिच्या अंगावरचे सोन्याचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि मयत महिलेचे सोन्याचे दात घेऊन पळ काढल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी स्थापन केली एसआयटी
वयस्कर महिलेची अशाप्रकारे गजबजलेल्या ठिकाणी हत्या झाल्याच्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी एक विशेष तपास पथक स्थापन केले. आरोपीची माहिती देणाऱ्याला 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाजवळ राहणाऱ्या लोकांची चौकशी केली आणि तांत्रिक पुरावे गोळा केले. तपासादरम्यान, मृत महिलेच्या घरासमोर राहणाऱ्या महिलेची म्हणजेच रेखाची भूमिका संशयास्पद वाटू लागली. पोलिसांनी आपल्या पद्धतीने पोलीसी खाक्या दाखवत चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी महिला मूळची महाराष्ट्रातील
अटक करण्यात आलेली आरोपी रेखा ही 45 वर्षांची असून ती मूळची महाराष्ट्रातील भुसावळ येथील रहिवासी आहे. रेखा सध्या भोपाळमधील ईदगाह हिल्स येथील ए-1/जी-7 मल्टी बाजपेयी नगर येथे वास्तव्यास होती. रेखाचे पती सुरेश सुडारकर यांचं यापूर्वीच निधन झालं आहे. पोलिसांनी रेखाकडून मृत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने जप्त केले. यामध्ये कानातले, नथ, सोन्याचे दात, पैंजण आणि रोख रक्कमेचा समावेश आहे. गुन्ह्याच्या वेळी रेखाने परिधान केलेले कपडे, चप्पल आणि मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध यापूर्वी दाखल आहेत गुन्हे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा ही हिस्ट्री शिटर आहे. म्हणजेच तिच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहे. रेखाविरुद्ध निशातपुरा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तसेच शहाजहानाबाद पोलीस ठाण्यात सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हाही रेखाविरुद्ध दाखल आहे.