मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशनच्या विधेयकावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून 30 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत होणाऱ्या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा हे विधेयक मांडलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिल्याने ते याच अधिवेशनात मांडलं जाईल असं सांगितलं जात आहे. या विधेयकाच्या बाजूने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'इंडिया' आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, व्हायएसआर काँग्रेस, डीएमकेसारखे पक्षही मतदान करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरुन काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच आता मागील काही काळापासून सातत्याने काँग्रेस ज्या व्यक्तीला विरोध करतेय ते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरच सरकार मतदारसंघ पुनर्रचनेची जबाबदारी सोपवणार असल्याची दाट शक्यता आहे. देशाचा नवा राजकीय नकाशा आखणाऱ्या आयोगावर ज्ञानेश कुमार यांचाच दबदबा असेल अशी चिन्हं दिसत आहेत.
ज्ञानेश कुमार यांची वर्णी कशी लागणार?
डिलिमिटेशन विधेयकातील कलम 3 नुसार केंद्र सरकार स्वतंत्र पुनर्रचना आयोग स्थापन करणार आहे. या आयोगामध्ये तीन सदस्य असतील. नियमानुसार, यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा माजी न्यायमूर्ती आयोगाचे अध्यक्ष असतील. यासोबत दोन अन्य सदस्यही असतील. हे दोन दस्य म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी नियुक्त केलेले आयुक्त असू शकतात. ज्यात संबंधित राज्याचे निवडणूक आयुक्त असे तीन सदस्य असतील. म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना करणाऱ्या आयोगावरही ज्ञानेश कुमार यांचा दबदबा असणार हे या नियमावरुन स्पष्ट होत आहे. मतचोरीच्या मुद्द्यावरून ज्ञानेश कुमार विरोधकांच्या निशाण्यावर असताना देशाचा राजकीय नकाशा बदलण्याची जबाबदारी असणाऱ्या आयोगात देखील त्यांची वर्णी लागणार का? याकडे लक्ष लागले आहे.

ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप
यापूर्वीही ज्ञानेश कुमार हे वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमधील वादामध्ये अनेकदा ज्ञानेश कुमार यांनी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला मदत होईल अशा भूमिका घेतल्याचे आरोप विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केले आहेत. निवडणूक आयोगाने देशभरात राबवलेल्या 'विशेष सखोल पुनरीक्षण' (एसआयआर) मोहिमेअंतर्गत कोट्यवधी पात्र मतदारांची नावे यादीतून वगळली गेल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. एका विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा पोहोचवण्यासाठी मतदार याद्यांमध्ये फेरफार केल्याचा दावा विरोधकांकडून होत आहे.
अन्य दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी 10 महिन्यांच्या कालावधीत किमान 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अन्य आयुक्तांना विश्वासात न घेता परस्पर आणि एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करणारी बातमी 'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तात करण्यात आल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या मुद्द्यावरुनच काँग्रेसने मतचोरीचे आरोप कर ज्ञानेश कुमार यांना पदावरुन हटवण्याची मागणी केलेली.