SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

BREAKING NEWS: सोनिया गांधींचा खर्गे, राहुल गांधींसोबत तातडीचा मुंबई दौरा; रात्री आठला होणार दाखल, कारण...

मागील काही दिवसांपासून देशातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच दुसरीकडे शरद पवार रुग्णालयात दाखल आहेत. डिहायड्रेशनच्या त्रासामुळे त्यांना गुरुवारी 26 नोव्हेंबर रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ते तिथेच उपचार घेत आहेत.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 29, 2026, 09:53 IST | Updated: Nov 29, 2026, 10:28 IST
Image Credit: सोनियांसोबत मल्लिकार्जून खर्गेही असणार (प्रातिनिधिक फोटो)
Join

मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकावरुन 'इंडिया' आघाडीमधील दोन महत्त्वाच्या घटकपक्षांनी सरकारच्या बाजूने भूमिका घेतल्याने काँग्रेस अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे. दक्षिणेतील द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच द्रमुक आणि महाराष्ट्रातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतल्याने आज काँग्रेसचे महत्त्वाचे नेते चेन्नई आणि मुंबईचा तातडीचा दौरा करणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आज चेन्नई आणि मुंबई दौरा करणार आहेत. या दोन प्रमुख नेत्यांसोबत राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, काँग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्री डी. के शिवकुमार, रेवंत रेड्डीही असणार आहेत.

आधी चेन्नई दौरा

चेन्नईमध्ये काँग्रेसचे दोन्ही प्रमुख नेते द्रमुकचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत.  केंद्र सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षण विधेयकाला द्रमुकने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष असूनही द्रमुकने तामिळनाडूच्या हिताच्या काही अटी मान्य झाल्यानंतर या विधेयकाला समर्थन देत असल्याचं म्हटलं आहे. राज्यातील जागाही 50 टक्क्यांनी वाढवण्याची द्रमुकची मागणी होती. ही मान्य झाल्याने पक्षाने सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. पण आता स्टॅलिन यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून केला जाणार आहे. दुपारी 2 वाजता काँग्रसचे हे दोन्ही ज्येष्ठ नेते चेन्नईमध्ये दाखल होणार असून ते दुपारी 2 ते 5 दरम्यान स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत. 

रात्री शरद पवारांची भेट घेणार

दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही सरकार समर्थनार्थ भूमिका घेतली असल्याने सरकारची ताकद अधिक वाढली आहे. काँग्रेसचा जुना मित्र पक्ष असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 8 खासदार आहेत. त्यामुळे या खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान करावं असं काँग्रेसचं मत असून याचसंदर्भातील चर्चेसाठी खर्गे आणि सोनिया गांधी शरद पवारांना भेटणार आहेत. शरद पवार हे सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. इथेच सोनिया गांधी आणि खर्गे त्यांची भेट घेणार आहेत. चेन्नई दौऱ्यानंतर दोन्ही नेते रात्री आठच्या सुमारास मुंबईत दाखल होतील असं सांगितलं जात आहे. 

पवारांबद्दल काँग्रेसची सामंजस्याची भूमिका, राहुल म्हणाले...

दरम्यान, दुसरीकडे शनिवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी शरद पवारांसंदर्भात मोठं विधान केलं. "शरद पवारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं तरी त्यांचं इंडिया आघाडीमधील स्थान कायम राहणार आहे. या विधेयकासंदर्भातील मतदानावरुन पवारांचं इंडिया आघाडीतील स्थान बदलणार नाही," असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने शरद पवारांसंदर्भात सामंजस्याची भूमिका घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES