भारतीय वायुसेनेतील एका विंग कमांडरवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित महिलेला देशाच्या सुरक्षेशी निगडित गोपनीय माहिती दिल्याचा गंभीर आरोप आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणाचा तपास करून आरोपपत्र दाखल केले आहे. संबंधित अधिकारी 44 वर्षांचा असून त्याचे नाव सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक करण्यात आलेले नाही. जानेवारी ते एप्रिल 2026 या कालावधीत तो संबंधित महिलेच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आलंय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
संबंधित अधिकाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी सुरू असताना एका महिलेने त्याच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला चुकीच्या क्रमांकावर मेसेज पाठवल्याचे सांगून संवाद सुरू झाला. संबंधित महिला मानसिक तणावात असल्याचे सांगत समुपदेशनासाठी मदत मागत होती. यानंतर दोघांमध्ये हळूहळू जवळीक निर्माण झाली. त्यानंतर व्हॉट्सॲप आणि अन्य डिजिटल माध्यमांवरून संवाद सुरू झाला, असे तपास यंत्रणांच्या माहितीतून समोर आलंय. या महिलेचा संबंध पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेशी होता, असं पोलिसांनी सांगितलंय.
संबंधित महिलेने अधिकाऱ्याला खासगी स्वरूपाचे फोटो पाठवले. त्यानंतर त्याने भारतीय वायुसेनेच्या युद्धनियोजनाशी संबंधित गोपनीय कागदपत्रांचा काही भाग तिला पाठवल्याचा आरोप आहे. प्रत्येक खासगी फोटोच्या बदल्यात युद्धनियोजनाच्या कागदपत्रांमधील आणखी माहिती देण्याचे आश्वासनही त्याने दिल्याचे तपासात नमूद आहे. ड्रोनची क्षमता, वायुसेनेच्या कारवाया आणि लष्करी तैनातीसंबंधी माहिती शेअर केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे संबंधित अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये मालवेअर इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न केला.यामुळे अन्य संरक्षण कर्मचाऱ्यांची माहिती मिळवणे, डिजिटल संवादावर नजर ठेवणे किंवा उपकरणांमधील डेटा चोरणे शक्य झाले असते, असे तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून अन्य कर्मचाऱ्यांच्या उपकरणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला का?, याचाही तपास करण्यात आला.
या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी संबंधित विंग कमांडरविरोधात ऑफिशियल सिक्रेट एक्ट्स अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र पटियाला हाऊस न्यायालयासमोर असून खटला पुढे चालवण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची मंजुरी अद्याप मिळणे बाकी आहे. न्यायालयाने ही मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.