देशभरात दिवाळीचा सण साजरा सुरू झालाय. एकीकडे दिवाळीचा उत्साह असताना दुसरीकडे फटाके वाजवण्यावरुन भांडण ते हत्येपर्यंतच्या घटना समोर येत आहेत. फटाके फोडण्यावरून झालेल्या वादाने भीषण स्वरूप धारण केलंय. हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यातील बदोली गावात दोन शेजारी कुटुंबांमध्ये झालेल्या भांडणार पती-पत्नीचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. सुरुवातीला अगदी किरकोळ वाटणाऱ्या वादातून एका व्यक्तीने कथितपणे थार गाडी कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर घातली. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून गुन्हे नोंदवून तपास सुरू केलाय.काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
8 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या रात्री बदोली गावातील दोन शेजारी कुटुंबांमध्ये वाद झाला. केशव ठाकूर याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मी आपल्या कुटुंबासह घराच्या अंगणात फटाके फोडत होतो. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या कुटुंबासोबत जुन्या वादातून बाचाबाची झाली. हा वाद वाढत गेल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली. यापूर्वीही या कुटुंबांमध्ये वाद झाला होता, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर हल्ला केल्याचे आरोप करण्यात आला. केशव ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, परमजीत याने त्यांच्या डोक्यावर शस्त्राने वार केला. तसेच ओंकार सिंह यांनी त्याचे वडील जरनैल सिंह यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपही केला. दुसरीकडे, अजमेर सिंह यांनी दिलेल्या तक्रारीत वेगळी बाजू मांडली आहे. त्यामुळे हाणामारीची सुरुवात नेमकी कशी झाली?, याचा तपास पोलीस करत आहेत.
रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास जरनैल सिंह उर्फ जैला हा मुलगा केशव याच्यासह थार गाडीतून त्यांच्या घराबाहेर आला. त्यानंतर त्याने वेगाने आणलेली थार गाडी कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर घातली. या घटनेत ओंकार सिंह, त्यांची पत्नी वीना देवी, अजमेर सिंह आणि सुषमा देवी जखमी झाले. जखमींना ऊना येथील प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी ओंकार सिंह आणि त्यांच्या पत्नी वीना देवी यांना मृत घोषित केले. अजमेर सिंह यांनी दाखल केलेल्या तक्रारीत ही माहिती दिली.
या दुहेरी मृत्यूच्या घटनेनंतर गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी आरोपी जरनैल सिंह याला पकडून मारहाण केली. या मारहाणीत तोही गंभीर जखमी झाला. त्याला सुरुवातीला ऊना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी चंदीगड येथील पीजीआयएमईआर रुग्णालयात हलवण्यात आल्याचे वृत्त पीटीआय वृत्त संस्थेने दिले आहे आहे. दरम्यान, गावातील तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
ऊना पोलिसांनी या प्रकरणात जरनैल सिंह याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक सचिन हिरमठ यांनी याची माहिती दिली. दुसऱ्या बाजूनेही मारहाण आणि दरातीने हल्ला केल्याच्या तक्रारीवरून कारवाई सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणात काही अल्पवयीन व्यक्तींची नावेही तक्रारीत असल्याने त्यांच्याबाबत बाल न्याय कायद्यानुसार प्रक्रिया केली जात आहे.