SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'ED सुपर कॉप नाही, ऊठसूट दिसेल त्या प्रत्येक...', कोर्टाने झापलं; काँग्रेस नेत्याची निर्दोष मुक्तता! केस बंद

उच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना 'ईडी'ला चांगलेच फैलावर घेतल्याचं दिसून आलं. नेमकं उच्च न्यायालयाने काय म्हटलं आणि न्यायालयाचं म्हणणं काय आहे जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 09, 2026, 09:57 IST | Updated: Nov 09, 2026, 10:11 IST
Image Credit: काँग्रेस नेत्याला न्यायालयाने दिला मोठा दिलासा (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य वृत्तसंस्था आणि फेसबुकवरुन साभार)
Join

केंद्र सरकारच्या ताब्यातील तपास यंत्रणा असलेल्या अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच 'ईडी'च्या कारभारावर कर्नाटक उच्च न्यायालयाने कठोर ताशेरे ओढले आहेत.  "तुम्ही काही 'सुपरकॉप' नाही. ऊठसूट दिसेल त्या प्रत्येक प्रकरणाची चौकशी करू शकत नाही," असं न्यायालयाने म्हटलं आहे. " तुम्हाला कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करावी लागेल," अशा शब्दांमध्ये न्यायालयाने 'ईडी'ला सुनावलं आहे. काँग्रेस नेते के. वाय. नंजेगौडा यांच्याविरोधातील मनी लॉण्डरिंगचा गुन्हा रद्द करताना न्यायालयाने ही टीप्पणी केली. हा निर्णय केंद्रीय तपास यंत्रणा 'ईडी'बरोबरच मोदी सरकारला मोठा झटका मानला जात आहे.

...तर ईडी स्वत:हून तपास करु शकत नाही

'ईडी'ने कायद्याच्या चौकटीत आणि घटनात्मक सीमांचे पालन करूनच काम केले पाहिजे, असं म्हणत न्यायालयाने केंद्रीय संस्थेला फैलावर घेतलं. "अंमलबजावणी संचालनालय हा काही 'सुपर कॉप' नाही जो समोर येणाऱ्या प्रत्येक प्रकरणाचा तपास करत बसेल," असं न्यायालयाने म्हटलं.  जर स्थानिक पोलीस किंवा इतर सक्षम यंत्रणांनी एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यास नकार दिला, तर 'ईडी' स्वतःहून फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत खाजगी तक्रार दाखल करून तपास सुरू करू शकत नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

मूळ गुन्हाच रद्द झाला असल्यास...

के. वाय. नंजेगौडा यांच्याविरोधातील मूळ गुन्हाच रद्द करण्यात आल्याने 'ईडी'ला 'प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट'अंतर्गत  (पीएमएलए) कारवाई करण्याचा वावच उरला नाही. पीएमएलएअंतर्गत कारवाईसाठी मूळ गुन्हा अस्तित्वात असणे बंधनकारक आहे. जर मूळ गुन्हाच रद्द किंवा केस बंद झाली असेल तर 'ईडी'चा मनी लाँड्रिंगचा तपास सुरू राहू शकत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

कोणतीही संस्था कायद्याच्या वर नाही

तसेच 'पीएमएलए'च्या कलम 66(2) नुसार, जर 'ईडी'ला तपासादरम्यान एखाद्या अनुसूचित गुन्ह्याची माहिती मिळाली, तर त्यांनी ती सामग्री स्वतःकडे न ठेवता संबंधित तपास यंत्रणेकडे सोपवणे कायदेशीररीत्या गरजेचे आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, 'ईडी'चे अधिकार हे मूळ नसून त्यांना 'पीएमएलए' कायद्याने दिलेले मर्यादित अधिकार आहेत. त्यामुळे कोणतीही संस्था स्वतःला कायद्याच्या वर समजू शकत नाही, असं न्यायालयाने 'ईडी'च्या कारभारावर ताशेरे ओढताना म्हटलं.

के. वाय. नंजेगौडाविरोधातील 'ईडी'चं प्रकरण काय

के. वाय. नंजेगौडा हे मालूरच्या जमीन वाटप समितीचे अध्यक्ष असताना, त्यांनी आणि समितीच्या इतर सदस्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आलेला. के. वाय. नंजेगौडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 38 लोकांना सुमारे 80 एकर सरकारी जमीन बेकायदेशीरपणे वाटप केल्याचा आरोप करण्यात आलेला. या प्रकरणाला मुख्य गुन्हा मानून 'ईडी'ने नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा (पीएमएलए) गुन्हा दाखल केला होता. या जमीन घोटाळ्याच्या तपासादरम्यान 'ईडी'ने जानेवारी 2024 मध्ये नंजेगौडा यांच्या ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यादरम्यान 'ईडी'ला कोलार-चिक्कबल्लापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात 2023 मध्ये झालेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेत अनियमितता आणि पैशांचे गैरव्यवहार झाल्याचे पुरावे आढळल्याचा दावा 'ईडी'ने केला होता. 

जमीन वाटपाच्या मूळ प्रकरणात स्थानिक पोलिसांनी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. तसेच, लोकसेवकाविरुद्ध खटला चालवण्यासाठी आवश्यक असणारी सरकारी मंजुरी न मिळाल्यामुळे ट्रायल कोर्टाने हा खटला बंद केला होता. मूळ गुन्हा तांत्रिक कारणास्तव बंद झाला असला, तरी मनी लाँड्रिंगचा तपास सुरूच राहू शकतो असा दावा करत 'ईडी'ने आपली कारवाई सुरू ठेवली. 'ईडी'ने नंजेगौडा यांची सुमारे 1.32 कोटी रुपयांची मालमत्ता देखील जप्त केली होती. याच दाव्याला न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं असता न्यायमूर्ती एम. आय. अरुण यांच्या खंडपीठाने 'ईडी'लाच झापत हे प्रकरण निकाली काढत काँग्रेस नेत्याविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES