Explained: ....आता सोनिया गांधींकडून शेवटची आशा; CTI चं पत्र; 'राहुल गांधींना आम्ही तीन वेळा..'; 10 ते 12 हजार कोटींचं संकट
दिल्लीतील रामलीला मैदानावर 1 नोव्हेंबर रोजी काँग्रेसने आयोजित केलेल्या 10 लाख लोकांच्या प्रस्तावित महारॅलीमुळे दिल्लीतील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दिल्लीतील रामलीला मैदानावर 1 नोव्हेंबर रोजी काँग्रेसने आयोजित केलेल्या 10 लाख लोकांच्या प्रस्तावित महारॅलीमुळे दिल्लीतील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ही महारॅली दिवाळीनंतर, म्हणजेच 10-11 नोव्हेंबरनंतर आयोजित करावी, अशी मागणी दिल्लीतील व्यापारी आणि उद्योजकांची संघटना चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (CTI) ने काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून केली आहे.
CTI चे अध्यक्ष बृजेश गोयल म्हणाले, "आमचा रॅलीला विरोध नाही. मात्र, दिवाळीच्या हंगामात आमचा व्यवसाय आणि रोजीरोटी वाचवण्यासाठी आम्ही हात जोडून विनंती करत आहोत. 6 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आणि 8 नोव्हेंबरला दिवाळी आहे. 1 नोव्हेंबर हा सणाच्या तयारीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अशा वेळी 10 लाख लोक आणि 15 ते 20 हजार वाहने मध्य दिल्लीत आली, तर परिसरातील 20 ऐतिहासिक बाजारांमधील दररोजचा 10 ते 12 हजार कोटी रुपयांचा व्यापार ठप्प होऊ शकतो."
CTI ने पत्रात मांडली चार प्रमुख संकटे
- रामलीला मैदानावर पार्किंगची अपुरी व्यवस्था
रामलीला मैदानावर 200 मोठ्या बस उभ्या करण्याइतकीही पार्किंगची व्यवस्था नसल्याचा दावा CTI ने केला आहे. 10 लाख लोकांना आणण्यासाठी 15 ते 20 हजार बस, कार आणि टेम्पोंची आवश्यकता भासू शकते. ही वाहने जवाहरलाल नेहरू मार्ग, बहादूरशाह जफर मार्ग, नेताजी सुभाष मार्ग, अजमेरी गेट, चांदणी चौक रोड आणि आसपासच्या भागांत उभी राहिल्यास पार्किंगची मोठी समस्या निर्माण होईल. त्यामुळे मध्य दिल्ली आणि जुन्या दिल्लीत वाहतूक कोंडी होऊन लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती CTI ने व्यक्त केली आहे.
- पाच किलोमीटरच्या परिसरातील 20 हून अधिक बाजारांवर परिणाम होण्याची भीती
रामलीला मैदानाच्या पाच किलोमीटरच्या परिसरात अनेक ऐतिहासिक घाऊक आणि किरकोळ बाजार आहेत. या बाजारांमध्ये दररोज 10 ते 12 हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा दावा CTI ने केला आहे.
या बाजारांमध्ये चांदणी चौक, सदर बाजार, कनॉट प्लेस, पालिका बाजार, जनपथ, भागीरथ पॅलेस, खारी बावली, काश्मिरी गेट, नया बाजार, लाजपत राय मार्केट, चावडी बाजार, किनारी बाजार, दरीबा कलान, बल्लीमारान, फतेहपुरी, तिलक बाजार, करोल बाग, जामा मशीद, नबी करीम, गफ्फार मार्केट, अजमेरी गेट-पहाडगंज आणि दरियागंज यांचा समावेश असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
दिल्लीतील नरेला, बवाना, ओखला, मायापुरी, मुंडका, उद्योग नगर आणि मंगोलपुरीसह ५६ औद्योगिक क्षेत्रांतून दररोज सुमारे 5 हजार ट्रक आणि टेम्पोंद्वारे या बाजारांमध्ये माल आणला जातो. तसेच येथून दररोज सुमारे 3 हजार ट्रक माल गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद, सोनीपत आणि पानिपतसह एनसीआरमधील 25 शहरांमध्ये तसेच देशभरात पाठवला जातो.
- 31 ऑक्टोबरपासूनच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
महारॅलीसाठी येणाऱ्या बस आणि वाहनांची गर्दी 31 ऑक्टोबरच्या दुपारपासूनच सिंघू, टिकरी, गाझीपूर आणि बदरपूर या दिल्लीच्या सीमांवर सुरू होऊ शकते. त्यानंतर संध्याकाळपासून बहादूरशाह जफर मार्ग आणि जवाहरलाल नेहरू मार्गावर बॅरिकेडिंग होण्याची शक्यता आहे.
वाहतूक कोंडीच्या भीतीमुळे काही वाहतूकदार 31 ऑक्टोबरपासूनच मालवाहू गाड्या पाठवण्यास नकार देत असल्याचे CTI ने म्हटले आहे. त्यामुळे व्यापारावर परिणाम केवळ 1 नोव्हेंबरलाच नव्हे, तर त्याच्या आदल्या दिवसापासून होऊ शकतो.
- 10 ऑक्टोबरच्या वाहतूक कोंडीचे उदाहरण
CTI च्या म्हणण्यानुसार, 10 ऑक्टोबर रोजी जंतरमंतर येथे केवळ 5 ते 7 हजार लोक जमले होते. त्यावेळी मध्य दिल्लीतील वाहतूक आठ तासांपर्यंत विस्कळीत झाली होती. आता 10 लाख लोकांच्या प्रस्तावित महारॅलीमुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे.
सोनिया गांधींकडे CTI च्या दोन प्रमुख मागण्या
1) 1 नोव्हेंबरची महारॅली 10-11 नोव्हेंबरनंतर घ्यावी, जेणेकरून धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या काळात व्यापाऱ्यांच्या व्यवसायात अडथळे निर्माण होणार नाहीत.
2) महारॅली पुढे ढकलणे शक्य नसल्यास ती रामलीला मैदानाऐवजी बुराडी मैदानावर आयोजित करावी. तेथे १५ हजार वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध असल्याचा दावा CTI ने केला आहे.
"दिवाळीच्या हंगामात व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाचवा"
बृजेश गोयल म्हणाले, "हे 20 बाजार म्हणजे केवळ बाजारपेठा नाहीत, तर दिल्लीचा गाभा आहे. येथे दररोज 10 ते 12 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. 6 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे. अशा वेळी 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला मध्य दिल्लीत लॉकडाऊनसारखी वाहतूक कोंडी झाली, तर व्यापाऱ्यांचा माल कसा येणार आणि कसा जाणार?"
ते पुढे म्हणाले, "आम्ही सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे, कारण त्यांनी नेहमीच छोट्या व्यापाऱ्यांचा आवाज ऐकला आहे. त्या आमची विनंती मान्य करून महारॅली दिवाळीनंतर घेण्याचा निर्णय घेतील, अशी आम्हाला आशा आहे. आम्ही राहुल गांधी यांनाही तीन पत्रे लिहून विनंती केली होती; मात्र त्यांनी आमची मागणी मान्य केली नाही. आता सोनिया गांधी यांच्याकडून शेवटची आशा आहे."