लैंगिक सुखाची मागणी, नकार अन्... अंकिता भंडारी प्रकरण आहे तरी काय? 19 वर्षीय तरुणीसोबत काय घडलं? या साऱ्याचा भाजपाशी काय संबंध?
संपूर्ण राज्यासहीत देशाला हादरवून सोडणारं अंकिता भंडारी प्रकरण आता राजकीय कारणांमुळे पुन्हा चर्चेत आलं आहे. नेमकं 2022 मध्ये काय घडलं होतं? ही अंकिता आहे तरी कोण? आता हे प्रकरण चर्चेत येण्याचं कारण काय? जाणून घ्या सविस्तरपणे...
भाजपचे ज्येष्ठ नेते दुष्यंत गौतम यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्यापासून अंकिता भंडारी प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. अंकिता भंडारी प्रकरणामध्ये दुष्यंत गौतम सहभागी असल्याचा आरोप अंकिताच्या पालकांकडून केला जात आहे. त्यामुळेच दुष्यंत गौतम राज्यपाल होणार हे समजल्यानंतर अंकिताच्या आई-वडिलांनी नवी दिल्लीमधील इंडिया गेट इथे आंदोलन सुरु केलं. या आंदोलनाला बुधवारी सायंकाळी विरोधीपक्ष नेते राहुल गांधींनी भेट दिली. त्यांनी अंकिताला आम्ही न्याय मिळवून देऊ असा विश्वास पालकांना दिला. मात्र पहाटे 3.45 वाजता अचानक अंकिताच्या पालकांबरोबरच इंडिया गेट इथे आंदोलन करत असलेल्या काँग्रेसच्या खासदारांना दिल्ली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांनी ताब्यात घेतलं. या वेळी अंकिताची आई रडत असतानाही तिला दिल्ली पोलिस दलातील महिलांनी बळजबरीने बसमध्ये बसवलं. अंकिताच्या वडिलांनाही खेचून बसमध्ये बसवण्यात आलं. या कारवाईबद्दल काँग्रेसकडून संताप व्यक्त होत असतानाच अंकिता भंडारी प्रकरण नेमकं काय आहे याबद्दल या प्रकरणामुळे पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. त्यावरच नजर टाकूयात...
उत्तराखंडमधील एक अत्यंत धक्कादायक आणि बहुचर्चित गुन्हेगारी प्रकरण म्हणून अंकिता भंडारी हत्या प्रकरणाकडे पाहिलं जातं. ऋषिकेश येथील एका रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या 19 वर्षीय अंकिता भंडारी नावाच्या तरुणीची 2022 मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. नेमकं काय झालं होतं ते पाहूयात...
अंकिता सोबत काय घडलं?
19 वर्षीय अंकिता भंडारी ही उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील रहिवासी होती. ती ऋषिकेशजवळील यमकेश्वर ब्लॉकमधील 'वनंतरा रिसॉर्ट' येथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. 18 सप्टेंबर 2022 रोजी अंकिता अचानक रिसॉर्टमधून गायब झाली. 24 सप्टेंबर 2022 रोजी ऋषिकेश येथील चिल्ला कालव्यात अंकिताचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे आणि शरीरावर जखमा असल्यामुळे झाल्याचे समोर आले.
हत्या का करण्यात आली?
तपासादरम्यान, रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य आणि त्याचे व्यवस्थापक अंकितावर रिसॉर्टमध्ये येणाऱ्या व्हीआयपी ग्राहकांना 'स्पेशल सर्व्हिस'च्या नावाखाली पाहुण्यांच्या लैंगिक मागण्या पुरवण्यासाठी देण्यासाठी दबाव टाकत होते. अंकिताने या दबावाला स्पष्टपणे नकार दिला आणि हा प्रकार सर्वांसमोर उघड करण्याची धमकी दिली. याच रागातून आरोपींनी तिला कालव्यात ढकलून देऊन तिची हत्या केली.
मुख्य आरोपी कोण?
या प्रकरणात पोलिसांनी तीन मुख्य आरोपींना अटक केली. यामध्ये मुख्य आरोपी आणि भाजपाच्या माजी नेत्याचा मुलगा पुलकित आर्य, 'वनंतरा रिसॉर्ट'चा व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सह-आरोपी अंकित गुप्ता यांचा समावेश होता.
न्यायालयाने काय निकाल दिला?
साधारण तीन वर्ष चालेल्या न्यायालयीन लढ्यानंतर मे 2025 मध्ये कोटद्वारच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या तिन्ही आरोपींना दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
आताच्या राजकीय वादाचा संदर्भ काय?
या प्रकरणात ज्या 'व्हीआयपी' व्यक्तीसाठी अंकितावर दबाव टाकला जात होता, त्या संदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते दुष्यंत गौतम यांचे नाव एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून जोडले गेले. नुकतीच दुष्यंत गौतम यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला अंकिताच्या पालकांनी तीव्र विरोध केला असून, ही नियुक्ती रद्द करावी आणि प्रकरणाची संपूर्ण सीबीआय (CBI) चौकशी व्हावी या मागणीसाठी त्यांनी दिल्लीतील इंडिया गेटवर धरणे आंदोलन सुरू केले आहे. दुष्यंत गौतम यांचे नाव अद्याप अंकिता भंडारी प्रकरणातील कोणत्याही आरोपपत्रात आलेले नाही. मात्र या प्रकरणात अलीकडेच ज्या 'व्हीआयपी'चा (VIP) उल्लेख करण्यात आलेली व्यक्ती गौतमच असल्याचा अंकिता भंडारीच्या पालकांचा आरोप आहे.
आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी इंडिया गेटवर जाऊन अंकिताच्या पालकांची भेट घेतली आणि त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. "अंकिताला न्याय मिळेल आणि तिच्या आई-वडिलांनाही न्याय मिळेल. हा लढा कितीही काळ चालला तरी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी उभे आहेत," या कॅप्शनसहीत काँग्रेसने राहुल गांधींच्या भेटीचा व्हिडीओ पोस्ट केला.
काँग्रेस पदाधिकारी म्हणाला, हे लज्जास्पद
अंकिताच्या पालकांबरोबरच इंडिया गेट येथे आंदोलन करणारे काँग्रेस खासदार पवन खेरा, इम्रान प्रतापगढ़ी, जोथिमणी, आर सुधा आणि सुप्रिया श्रीनाटे, उदय भानू चिब, विनोद जाखड़, वरुण चौधरी यांच्यासह इतर नेत्यांना पोलिसांनी रात्री पावणे चारच्या सुमारास ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष विनोद झाकर यांनी संताप व्यक्त केलाय. "अंकिता भंडारीसाठी न्यायाची मागणी करत इंडिया गेटवर शांततेने आंदोलन करणाऱ्या तिच्या आई-वडिलांना पहाटे साडेचार वाजता पोलिसांनी ताब्यात घेणे, ही अत्यंत लज्जास्पद आणि अमानवीय कृती आहे," असं विनोद यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना, "ज्या देशात न्यायाची मागणी करणाऱ्या पीडितेच्या कुटुंबाचे मध्यरात्री अपहरण केले जाते, तिथे सरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. भाजप सरकारची भूमिका स्पष्ट आहे—न्यायाची मागणी करणाऱ्या पीडितेच्या कुटुंबासोबत उभे राहण्याऐवजी, व्हीआयपींच्या संरक्षणासाठी राजकारण खेळले जात आहे," अशी टीकाही विनोद यांनी केली आहे.
या प्रकरणामध्ये आता काँग्रेसची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.