ला इलाहा इल्लल्लाह... 7 वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या कट्टर हिंदू नेत्याचे भर सभेत इस्लामचे कलमा पठण; कारण जाणून सगळेच शॉक
भाजपच्या कट्टर हिंदू नेत्याने भर सभेत इस्लामचे कलमा पठण केले आहे. राजस्थानात हा प्रकार घडला आहे. यामुळे सगळेच अचंबित झाले.
राजेंद्र राठोड : भाजप हा हिंदूत्वाचा अजेंडा चालवाणार पक्ष आहे. भाजपचे अनेक नेते कट्टर हिंदू आहेत. भाजपच्या बड्या कट्टर हिंदू नेत्याने भर सभेत इस्लामचे कलमा पठण केले आहे. यामुळे सगळेच शॉक झाले आहेत. हा नेता तब्बल 7 वेळा आमदार राहिला आहे. राजस्थानात हा प्रकार घडला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सुनेचा प्रचार करताना घेतलेल्या प्रचार सभेत या नेत्याने कलमा पठण करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
राजेंद्र राठोड असे या नेत्याचे नाव आहे. राजेंद्र राठोड हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. इतकचं नाही तर ते राजस्थानचे सात वेळा आमदार राहिलेले आहेत. राजस्थानमधील चुरू येथे एका जाहीर सभेत त्यांनी इस्लाममधील पहिल्या कलमाचे पठण केले. राजेंद्र राठोड यांची सून कनिका सिंह या चुरू जिल्हा परिषद निवडणुकीत वॉर्ड 23 मधून निवडणूक लढवत आहेत. सुनेच्या प्रचारासाठी राजेंद्र राठोड स्वत: मैदानात उतरले आहेत.
कनिका सिंग यांनी देखील 'अस्सलामु अलैकुम' म्हणत लोकांशी संवाद साधला. ज्या प्रभागातून त्या निवडणूक लढवत आहेत, तिथे मोठ्या संख्येने कायमखानी मुस्लिम राहतात. कनिका व्यतिरिक्त, तिचे पती आणि भाजप नेते राजेंद्र राठोड यांचे पुत्र पराक्रम राठोड हे देखील चुरू जिल्हा परिषदेच्या प्रभाग 39 मधून निवडणूक लढवत आहेत.
काँग्रेसची टीका
काँग्रेसने राठोड यांच्यावर टीका केली आहे. समाजात फूट पाडणे ही आरएसएस आणि भाजपची विचारधारा आहे. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही अल्पसंख्याक उमेदवारांना तिकीटही देत नाहीत असा आरोप पक्षाचे प्रवक्ते स्वर्णिम चतुर्वेदी यांनी केला आहे.
कोण आहेत राजेंद्र राठोड ?
राजेंद्र राठोड हे 1990 ते 2023 या काळात सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 1990 मध्ये, त्यांनी जनता दलाच्या तिकिटावर चुरू मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर, ते 1993, 1998, 2003, 2008, 2013 आणि 2018 मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून विजयी झाले. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे निकटचे सहकारी मानले जातात. त्यांनी 2013-18 या काळात राजस्थान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केले आहे.