HDFC Bank UPI SMS News : आजकाल UPI पेमेंट ग्राहक खूपच सहजपणे वापरतात. अगदी 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपयांच्या व्यवहारासाठी सुद्धा UPI पेमेंटचा वापर केला जातो. UPI च्या माध्यमातून एखादं पेमेंट करताच बँकेकडून एक SMS येतो की तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे कट झाले. मात्र आता येत्या नवीन वर्षापासून HDFC Bank च्या ग्राहकांना 500 पर्यंतच्या UPI पेमेंटवर SMS अलर्ट मिळणार नाही.
HDFC Bank ने आपल्या ग्राहकांना एक नोटिफिकेशन पाठवलं असून यात सांगण्यात आलंय की येत्या 1 जानेवारी 2027 पासून 500 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर SMS अलर्ट पाठवण बँकेकडून बंद केलं जाणार आहे. म्हणजेच जर तुम्ही 100, 200 किंवा 500 रुपयांचं UPI पेमेंट करत असाल तर तुम्हाला बँकेकडून SMS येणार नाही.
RBI चा नवा नियम आहे?
RBI ने इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांबाबत हे निर्देश जाहीर केले आहेत. हा नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार असून या नियमानुसार 500 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांसाठी बँकांना त्वरित SMS अलर्ट पाठवणे आवश्यक असेल. तर 500 रुपयांपर्यंत होणाऱ्या व्यवहारांचे SMS पाठवणं हे बँकेच्या आपल्या पॉलिसी नुसार असेल. म्हणजेच बँकेला हवं असेल तर SMS पाठवू शकतात किंवा ते लहान व्यवहारांचे SMS पाठवणं बंद करू शकतात. 500 रुपयांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांसाठी पाठवल्या जाणाऱ्या एसएमएस अलर्टसाठी बँका आता ग्राहकांकडून शुल्क आकारू शकत नाहीत. आरबीआयचा हा नियम केवळ यूपीआय (UPI) पुरताच मर्यादित नसून, तो सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांना लागू होतो.
आता कसं मिळणार व्यवहाराचं अलर्ट?
HDFC बँकेच्या एका अधिसूचनेनुसार 1 जानेवारीपासून 500 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांसाठी SMS अलर्ट पाठवले जाणार नाहीत. मात्र बँकेकडून सर्व UPI व्यवहारांसाठी ईमेलद्वारे अलर्ट मिळणे सुरूच राहील. म्हणजेच SMS सूचना बंद झाल्या तरी तुम्हाला ईमेलद्वारे अलर्ट मिळत राहतील. याव्यतिरिक्त बँकेच्या धोरणानुसार बँक इतर प्रकारच्या सूचनाही पाठवू शकते, जसे की इन-ॲप नोटिफिकेशन्स किंवा पुश नोटिफिकेशन्स.