सोन्याचे दागिने खरेदी करताना त्याची शुद्धता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. लग्नसराई, सण किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करताना ग्राहक हजारो किंवा लाखो रुपये खर्च करतात. मात्र, आपण खरेदी केलेले सोनं खरोखर शुद्ध आहे का, याची खात्री कशी करायची? अनेकदा घरात जुने सोन्याचे दागिने असतात. त्यांची शुद्धताही तपासण्याची गरज भासते. यासाठी काही प्राथमिक चाचण्या घरच्या घरी करता येतात. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या बीआयएस केअर ॲपमधील व्हेरिफाइड एचयूआयडी सुविधेच्या मदतीने हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची माहिती तपासता येते. सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी या पाच गोष्टी समजून घ्या.
सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यावर बीआयएस हॉलमार्क आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. अस्सल बीआयएस हॉलमार्कमध्ये तीन महत्त्वाच्या खुणा असतात.बीआयएसचा अधिकृत लोगो,सोन्याची शुद्धता दर्शवणारा क्रमांक,सहा अक्षरे आणि अंकांचा एचयूआयडी क्रमांक.उदाहरणार्थ, 22K916 म्हणजे 22 कॅरेट सोन्याची शुद्धता 91.6 टक्के आहे. त्याचप्रमाणे 18K750 म्हणजे 75 टक्के आणि 14K585 म्हणजे 58.5 टक्के सोन्याचे प्रमाण. केवळ दागिन्यांवर हॉलमार्क दिसतो म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. त्यावरील एचयूआयडी क्रमांकही तपासणे महत्त्वाचे आहे.
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी बीआयएस केअर हे भारतीय मानक ब्युरोचे अधिकृत मोबाइल ॲप उपयोगी ठरते. हे ॲप एंड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर उपलब्ध आहे. त्यातील व्हेरिफाय एचयूआयडी या पर्यायावर क्लिक करून दागिन्यावरील सहा अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक टाकता येतो.त्यानंतर संबंधित दागिन्याची शुद्धता, प्रकार, ज्वेलर आणि हॉलमार्किंग सेंटरची माहिती तपासता येते. जून 2026 मध्ये करण्यात आलेल्या डिजिटल सुधारणांनंतर काही नोंदींसाठी दागिन्याचा फोटो, हॉलमार्क आणि वजनाची माहितीही उपलब्ध होते. त्यामुळे प्रत्यक्ष दागिना आणि ॲपवरील माहिती यांची तुलना करता येते.
सोनं हे नैसर्गिकरित्या चुंबकीय नसते. त्यामुळे घरात असलेल्या मजबूत चुंबकाच्या मदतीने दागिन्याची प्राथमिक तपासणी करता येते. यासाठी दागिना सपाट जागेवर ठेवा आणि त्याच्याजवळ चुंबक आणा. दागिना चुंबकाकडे जोराने आकर्षित होत असल्यास त्यामध्ये इतर काही चुंबकीय धातू असण्याची शक्यता आहे. असे असले तरी दागिना चुंबकाला चिकटला नाही म्हणजे तो शुद्ध सोन्याचाच आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही. अनेक बनावट किंवा मिश्रधातूंचे दागिनेही चुंबकाला आकर्षित होत नाहीत. त्यामुळे ही केवळ प्राथमिक चाचणी समजावी.
सोनं हे तुलनेने जास्त घनतेचे धातू असल्यामुळे पाण्यात टाकल्यावर साधारणपणे तळाशी जाते. त्यामुळे एका भांड्यात पाणी घेऊन त्यात दागिना टाकल्यास तो बुडतो की नाही, याचे निरीक्षण करता येते. तसेच दागिन्यांच्या पृष्ठभागाचा रंगही तपासा. काही ठिकाणी रंग बदललेला दिसत असेल, सोन्याचा बाहेरील थर निघत असेल किंवा आतला वेगळ्या रंगाचा धातू दिसत असेल, तर दागिना गोल्ड प्लेटेड असण्याची शक्यता आहे.
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी लिंबाचा रस, व्हिनेगर, टूथपेस्ट किंवा ब्लीच वापरण्याचे अनेक घरगुती उपाय इंटरनेटवर सांगितले जातात. मात्र, असे प्रयोग करणे टाळावे. टूथपेस्टमुळे दागिन्यांच्या पृष्ठभागावर ओरखडे पडू शकतात. रासायनिक पदार्थांमुळे दागिन्यांचे बाहेरील आवरण किंवा त्यातील मोती, पाचू यांसारखे नाजूक खडे खराब होऊ शकतात.जुन्या दागिन्यांची शुद्धता तपासायची असल्यास बीआयएस मान्यताप्राप्त परख आणि हॉलमार्किंग केंद्रमध्ये तपासणी करून घ्यावी. तिथे एक्सआरएफ, इलेक्ट्रॉनिक किंवा अन्य व्यावसायिक चाचण्यांद्वारे धातूंचे प्रमाण तपासता येते. हॉलमार्क असलेल्या दागिन्याची शुद्धता नमूद केलेल्या शुद्धतेपेक्षा कमी आढळल्यास ग्राहकाला नियमानुसार नुकसानभरपाई मिळण्याचीही तरतूद आहे.