सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भाजपाला मोठा धक्का... पहिल्या रांगेत BJP चा बडा नेता; लवकरच 'घरवापसी'?
सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित असलेल्या नेत्यांच्या आसनव्यवस्थेवरून राजकीय चर्चांना उधाण आलेलं असतानाच या सोहळ्याचा चक्क एक भाजपाचा नेता उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. 'बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या सोहळ्याला राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे या सोहळ्याला एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने उपस्थिती लावली होती. त्यातही खास बाब अशी की या नेत्याला पहिल्या पंक्तीत स्थान देण्यात आलं होतं.
अखिलेश यादव यांना मानाचं स्थान
सोनिया गांधींच्या या आत्मचरित्राच्या प्रकाश सोहळ्यामध्ये आसनव्यवस्थेवरून राजकीय समीकरणांची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अखिलेश यादव यांना सोनिया गांधींच्या बाजूला मानाचे स्थान देण्यात आलं होतं. पुढील वर्षी होत असलेल्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र लढणार आहे. त्या पार्श्वभूमीवरच अखिलेश यांना थेट सोनिया गांधींच्या बाजूला स्थान मिळाल्याचं सांगितलं जात आहे. आजपासून या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा सुरु होणार आहे. त्यापूर्वीच दिल्लीतील कार्यक्रमात हे दोन्ही पक्षांमधील बॉण्डींग मजबूत करणारं चित्र दिसून आलं. या सोहळ्याला अखिलेश यांची पत्नी डिंपल यादवही उपस्थित होत्या.
राहुल गांधींच्या बाजूला बसलेल्या नेत्यानं वेधलं लक्ष
याचप्रमाणे पहिल्या रांगेत राहुल गांधींही बसले होते. त्यांच्याच बाजूला पहिल्या रांगेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांना मानाचे स्थान मिळाले. तामिळनाडूमधील विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय गुंतागुंतीदरम्यान काँग्रेसनं विजय यांची मदत करुन त्यांना सत्ता स्थापन करण्यास मदत केली होती. यामुळे दक्षिणेत नवीन समीकरण जुळल्याचं दिसून आलं. भविष्यातही विजय आणि राहुल गांधींची युती अधिक मजबूत होईल असा विश्वास दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जातोय.
भाजपाचा नेता पहिल्या रांगेत
या सर्वापेक्षाही अधिक चर्चा राहिली ती पंजाबमधील भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या उपस्थितीची! अमरिंदर सिंग हे या सोहळ्याला पोहचल्यानंतर अगदी ते कारमधून उतरेपासून ते संपूर्ण कार्यक्रमादरम्यानही त्यांच्यावर सर्वांचं विशेष लक्ष होतं. अमरिंदर सिंग यांना या कार्यक्रमात पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. पूर्वी अमरिंदर सिंग हे काँग्रेसमध्येच होते. काँग्रेसचे नेते म्हणून 2002 ते 2007 आणि त्यानंतर 2017 ते 2021 अशा दोन कार्यकाळात त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद सांभाळले. 2021 मध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वादानंतर त्यांनी वादानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी स्वतःचा 'पंजाब लोक काँग्रेस' पक्ष स्थापन केला आणि पुढे 2022 मध्ये तो भारतीय जनता पक्षात (भाजप) विलीन करून भाजपमध्ये प्रवेश केला. सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अमरिंदर यांनी हजेरी लावल्याने पुढील वर्षी होणाऱ्या पंजाबच्या विधानसभा निवडणुकींआधी ते काँग्रेसमध्ये घसवापसी करणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
इंडिया आघाडीचे इतरही अनेक नेत्यांची उपस्थिती
तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते.