समजूत काढण्यासाठी निघालेल्या राहुल गांधींना मोठा धक्का, चेन्नईत पोहोचण्याआधीच स्टॅलिन यांचा रिप्लाय, म्हणाले, 'इतिहास आम्हाला कट्टाबोमन म्हणून...'
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज चेन्नईमध्ये डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेणार असून राहुल गांधीदेखील सोबत असणार आहेत.
सोमवारी लोकसभेत डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित नवीन विधेयकं मांडली जाणार आहेत. भाजपकडून 360 चा आकड्याची जुळवाजुळव करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तर एकीकडे काँग्रेसदेखील अॅक्शन मोडमध्ये आला आहे. विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेणाऱ्या इंडिया आघाडीच्या दोन घटक पक्षांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आता मैदानात उतरल्या आहेत. या दोन प्रमुख नेत्यांसोबत राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, काँग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्री डी. के शिवकुमार, रेवंत रेड्डीही असणार आहेत. चेन्नईमध्ये काँग्रेसचे दोन्ही प्रमुख नेते द्रमुकचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत. एम के स्टॅलिन यांची भेट घेण्यापूर्वीच राहुल गांधींनी एक ट्विट केलं होतं. गांधींच्या या ट्विटला लगेचच स्टॅलिन यांनी रिप्लाय दिला आहे.
केंद्र सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षण विधेयकाला द्रमुकने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॅलिन यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून केला जाणार आहे. त्या आधीच राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं होतं. यामध्ये राहुल गांधी यांनी स्टॅलिन यांना 'बंधू' असे संबोधत लोकशाहीच्या रक्षणासाठी उभे राहण्याचे आवाहन केले होते.
इंडिया' आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि मी स्टॅलिन यांची भेट घेण्यासाठी चेन्नईला जात आहोत. आम्ही त्यांना आणि द्रमुक (DMK) पक्षाला विनंती करणार आहोत की, त्यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकांना विरोध करावा. लोकसभेच्या जागा 850 पर्यंत वाढवल्यास भारतातील लोकशाही संपुष्टात येईल. यामुळे भाजप-आरएसएसला भारताचा संपूर्ण निवडणूक नकाशा आपल्या फायद्यानुसार पुन्हा आखण्यासाठी अमर्याद संधी मिळेल, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
बंधू स्टॅलिन हे नेहमीच तामिळविरोधी शक्तींविरुद्ध खंबीरपणे उभे राहिले आहेत. राष्ट्रीय हितासाठी, तामिळनाडूच्या हितासाठी आणि राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी, आपल्याला मिळून या विधेयकाचा पराभव करायचा आहे, असं अवाहनदेखील राहुल गांधींनी केलं होतं.
राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी लगेचच एक ट्विट करत राहुल गांधींना उत्तर दिलं आहे. तामिळनाडू आणि तमिळ जनतेचे हित नेहमीच सर्वोच्च स्थानी ठेवून आम्ही प्रत्येक निर्णय घेतला आहे. या भूमिकेशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
स्टॅलिन यांनी पुढं म्हटलंय की, संविधानाचे संरक्षण आणि राज्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यामध्ये DMK ने बजावलेल्या ऐतिहासिक भूमिकेची दखल घेतल्याबद्दल बंधू राहुल गांधी यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. तामिळनाडू आणि तमिळ जनतेचे हित नेहमीच सर्वोच्च स्थानी ठेवून आम्ही प्रत्येक निर्णय घेतला आहे. मला विश्वास आहे की, इतिहास आम्हाला कट्टबोम्मन म्हणून लक्षात ठेवेल, एट्टप्पन म्हणून नाही.
(कट्टबोम्मन हे ब्रिटिशांविरोधात लढणारे स्वातंत्र्यवीर होते, तर एट्टप्पन हे विश्वासघाताचे प्रतीक मानले जातात.)
दरम्यान, राहुल गांधी यांचे विमान चेन्नईत पोहोचण्यापूर्वीच स्टॅलिन यांनी आपली भूमिका एकप्रकारे स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता सोनिया गांधी या स्टॅलिन यांचे मन वळवण्यात यशस्वी ठरतील का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.