दुचाकी असो किंवा चारचाकी... वाहन चालवणाऱ्यांमध्ये सर्वात मोठी दहशत असते ती वाहतूक पोलिसांची! याच वाहतूक पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीमधून आणि चेक पॉइण्ट्समधून सुटण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. मात्र दरवेळेस अशाप्रकारे सुटून जाणं शक्य होतं असं नाही. अनेकदा पोलिसांना चकवा देण्याच्या नादात वाहनचालक आपलं नुकसान करुन बसतात. असाच काहीसा मात्र थोडा विचित्र प्रकार उत्तराखंडमध्ये समोर आला असून या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे. नक्की झालं काय जाणून घेऊयात...
कुठे घडला हा प्रकार?
तर हा प्रकार घडलाय उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे! पोलीस चेक पॉइंटवरुन पळ काढण्याच्या नादात एकाने बायको मागे बसलेली असताना अचानक दुचाकी वळवली. मात्र आपला नवरा असं काही करणार असल्याची पुसटशीही कल्पना नसलेली ही महिला बेसावध बसली असल्याने दुचाकीवर मागे बसलेली या चालकाची पत्नी रस्त्यावर पडली. विशेष म्हणजे बायको जोरात रस्त्यावर पडल्यानंतरही हा चालक थांबला नाही. तो पोलिसांपासून वाचण्यासाठी तिथून फरार झाला. रुद्रपूरमधील त्रिशूल चौकात हा सारा प्रकार घडला असून येथे उपस्थित असलेल्या एका साक्षीदाराच्या मोबाईलमध्ये हा सारा प्रकार कैद झाला आहे. हा प्रकार पाहून अनेकांनी चालक बेजबाबदार असून त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
कशासाठी सुरु होती कारवाई?
पोलिसांच्या तपासणी मोहिमेदरम्यान नंबर प्लेट नसलेली वाहने आणि हेल्मेटच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात होती. त्यावेळी हेल्मेट न घातलेल्या पण कागदोपत्री गोंधळ असल्याने आपण पकडले जाऊन असं वाटणाऱ्या तसेच ट्रीपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वाराला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र गाडीचा वेग कमी करण्याऐवजी त्याने गाडीचा वेग वाढवला आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी अचानक दुचाकी वळवली.
महिला रस्त्यावर पडली अन्...
अचानक गाडी वळाल्याने मागे बेसावध बसलेली या चालकाची पत्नी तोल जाऊन रस्त्यावर पडली. मात्र पत्नी पडल्यानंतरही गाडी थांबवण्याऐवजी चालकाने तिथून धूम ठोकली. ही महिला रस्त्यावर पडल्यानंतर पोलिस कर्मचारी त्वरित त्या महिलेच्या मदतीला धावून गेले. पोलिस कर्मचाऱ्यांनी तिला धीर देत रस्त्यावरुन उठण्यास मदत केली. त्यानंतर तिला लागलं तर नाही ना यासंदर्भात विचारपूस केली.
Shocking news Uttarakhand, In his attempt to flee from the police at the checkpoint, he ended up causing his own wife to fall off the motorcycle. https://t.co/S0reB0IEUO
— Sambhawam (@hinduvision1) October 17, 2026
कठोर कारवाईची मागणी
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या चालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याच्यावर कारवाई केली तर इतर अनेकांना धडा मिळेल असं एकाने म्हटलं आहे. तर याच्यावर वाहतुकीसंदर्भातील चलनाबरोबरच बायकोचा जीव धोक्यात टाकल्याबद्दलही गुन्हा नोंदवण्याची मागणीही केली जात आहे.