सध्या डिलिमिटेशनची जोरदार चर्चा असून केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या सत्ताधारी पक्षांना विरोधकांपैकी काही पक्ष समर्थन करणार असल्याने हे विधेयक आगामी विशेष अधिवेशनात मांडलं जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र एकीकडे या घडामोडी सुरु असतानाच दक्षिणेतील एका नेत्याने थेट वेगळ्या राज्याची मागणी केली आहे. हा नेता कोण आणि त्याने काय म्हटलंय जाणून घेऊयात...
कोणी आणि काय म्हटलंय?
तर हा सारा प्रकार आहे, कर्नाटकमधला! "येत्या 5 ते 10 वर्षात 'उत्तर कर्नाटक' हे स्वतंत्र राज्य निर्माण होऊ शकते," असे मोठे विधान भाजप आमदार बालकृष्ण जारकीहोळी यांनी केलं आहे. आता जारकीहोळी यांनी केलेल्या विधानामुळे वेगळ्या राज्याची मागणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील अरभावी मतदारसंघाचे भाजप आमदार बालकृष्ण जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री दिवंगत उमेश कट्टी यांच्या स्वतंत्र राज्याच्या भूमिकेचे समर्थन केलं आहे. उत्तर कर्नाटकाचा अपेक्षित विकास झालेला नसल्याने सर्व पक्षांनी एकत्र येऊन यावर विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 2 डिसेंबरपासून बेळगाव येथे सुरू होणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जारकीहोळी यांचं हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
स्थानिक नेत्यांचीही मागणी
दक्षिण कर्नाटक विशेषतः बंगळूरु आणि परिसराच्या तुलनेत उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांवर निधी वाटपात अन्याय होत असल्याचा आणि प्रादेशिक असमतोल वाढल्याचा आरोप स्थानिक नेते व संघटनांकडून सातत्याने केला जात आहे. प्रशासकीय सोय आणि या भागाचा जलद विकास होण्यासाठी स्वतंत्र राज्य आवश्यक असल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. हेच मत आता अरभावी मतदारसंघाचे भाजप आमदार जारकीहोळी यांनी पुढे रेटलं आहे.
नव्या राज्यात कोणते जिल्हे?
स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्यासाठी बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाड, गदग, हावेरी, उत्तर कन्नड, कलबुर्गी, बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पळ, बल्लारी, विजयनगर आणि दावणगेरे या सुमारे 13 ते 15 जिल्ह्यांचा समावेश करण्याची मागणी यापूर्वीही झाली आहे. याशिवाय, बेळगावला राज्याची दुसरी राजधानी घोषित करावी आणि महत्त्वाची सरकारी कार्यालये सुवर्णसौधमध्ये स्थलांतरित करावीत, अशीही मागणी जोर धरत आहे.

मागणीचा विरोधही
दुसरीकडे, अनेक कन्नड संघटना आणि राजकीय पक्षांनी कर्नाटकच्या विभाजनाला कडाडून विरोध दर्शवला आहे. अखंड कर्नाटक टिकवून ठेवत उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी विशेष निधी देणे हाच यावर योग्य उपाय असल्याचे मत विरोधकांकडून मांडले जात आहे.