Rahul Gandhi On Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा दिला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी इंडिया आघाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे. यामुळे शरद पवारांनी NDA ला दिलेला पाठिंबा इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित पक्षावंर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. डिलिमिटेशन विधेयक अर्थात परिसीमन विधेयकावरून काँग्रेस नेत्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. शरद पवारांच्या भूमिकेबाबत राहुल गांधी यांचं मोठं विधान केले आहे.
राहुल गांधी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुका बेकायदेशीर ठरवत डीलिमिटेशन विधेयकावरुन राहुल गांधी सरकारवर जोरदार टीका केली. परिसीमन विधेयकाला पाठिंबा दिला किंवा विरोध केला तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची इंडिया आघाडीतील स्थिती बदलणार नाही असं राहुल गांधी म्हणाले. विधेयकाच्या समर्थनावरून मित्रपक्षांचा दर्जा ठरणार नाही असंही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
परिसीमनाचा मुद्दा म्हणजे लोकशाहीसाठीचा लढा आहे. लोकशाहीचं रक्षण कोण करतंय आणि कोण करत नाही, हे ठरवण्याची वेळ आहे. टीडीपीसारख्या एनडीएतील पक्षांनीही भारताच्या हिताचा विचार करावा. भारताचं संरक्षण आणि लोकशाही वाचवण्याचा विचार करण्याचं आवाहन राहुल गांधी यांनी केले.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 2024 मध्ये 14 कोटी अपात्र लोकांनी मतदान केले. त्यामुळे 2024 ची निवडणूक बेकायदेशीर ठरते. देशातील 80 टक्के नागरिक आणि जवळपास 100 टक्के Gen Z यांचा नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार निवडणुका चोरत असल्यावर विश्वास आहे. निवडणुकांमध्ये गैरप्रकार करण्यासाठी भाजपने नवा प्लॅन तयार केला आहे. या नव्या प्लॅनची रचना आणि त्याचे परिणाम आज स्पष्ट करणार.
जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. बिहारमध्ये मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली. आसाममध्ये भाजपच्या फायद्यासाठी संपूर्ण राज्याची पुनर्रचना करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये 100 पेक्षा जास्त जागा चोरण्यात आल्या.
मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांना आम्ही घेरले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत आमच्याकडे पुरेशी माहिती आहे. ही माहिती लवकरच सार्वजनिक करणार. लोकसभेच्या सध्याच्या 543 जागांऐवजी 850 जागा करण्याची भाजपची योजना आहे.
महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झाले आहे. त्याची अंमलबजावणी उद्याही होऊ शकते. मग 850 जागांची गरज काय. लोकसभेच्या 850 जागा झाल्यास भाजपला आपल्या फायद्यासाठी भारताचा निवडणूक नकाशा पुन्हा आखण्याची मोठी संधी मिळेल. या माध्यमातून भाजपविरोधी समुदायांचे प्रतिनिधित्व कमी करता येईल आणि विरोधी पक्षांच्या विशिष्ट नेत्यांना लक्ष्य करता येईल. लोकसभेच्या 850 जागांचा आकडा लक्षात ठेवा. हा भारतीय लोकशाहीच्या हत्येचा आकडा आहे.
850 जागांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांना भारतातील मतदारसंघांचा नकाशा आपल्या मर्जीनुसार बदलण्याची मोकळीक मिळणार. या बदलांमुळे देशातील लोकशाही व्यवस्था आणि तरुणांचे भविष्य धोक्यात येईल.
परिसीमन आयोगात ज्ञानेश कुमार सदस्य असतील. मोदी आणि अमित शाह यांच्या निवडीचा सर्वोच्च न्यायालयाचा एक माजी न्यायाधीश दुसरे सदस्य असतील, तर तिसऱ्या सदस्याची निवड ज्ञानेश कुमार स्वतः करणार आहेत.
परिसीमन आयोगाची रचना मोदी आणि शाह यांच्या पूर्ण नियंत्रणाखाली असेल. आयोगाच्या निर्णयांना न्यायालयात आव्हान देता येणार नाही.
निवडणूक आयोगावर कब्जा केल्यानंतर आता परिसीमन आयोगाच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ रचना बदलण्याची तयारी सुरू आहे. जातनिहाय जनगणना बाजूला ठेवण्यात आली असून 2027 ची जनगणनाही अप्रासंगिक ठरवण्यात आली आहे.