आंध्र प्रदेशमध्ये सोमवारी एक अत्यंत विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये एक इलेक्ट्रिक कार दुभजकाला म्हणजेच डिव्हायडरला धडकली. त्यानंतर या कार जागीच पेट घेतला. हे सारं इतक्या वेगाने घडलं की कारमधून या लोकांना बाहेर पडण्याचा वेळही मिळाला नाही. त्यामुळेच या कारमधून प्रवास करणाऱ्या चार जणांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका तीन वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. या अपघातात कारमधील आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील एनटीआर (NTR) जिल्ह्यातील विजयवाडा पश्चिम बायपासवर घडली.
मृतांची ओळख पटली
गुंटूर जिल्ह्यातील नंबुरू गावातील एका कार्यक्रमातून परतत असताना सोमवारी (12 ऑक्टोबर रोजी) सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. मृत व्यक्तींची ओळख पटली असून सर्वजण विजयवाड्याजवळील नुन्ना येथील रहिवासी होते. मृतांमध्ये कोम्मारेड्डी रामदेव (वय 39); त्यांची आई कोम्मारेड्डी अरुणा (वय 65) आणि बहीण टिगुरु विजया (वय 30) याच तीन प्रौढ लोकांचा समावेश असून चौथी मयत व्यक्ती एक लहान मूल आहे. त्याची ओळख पडलेली नाही.
चौघांचाही घटनास्थळीच मृत्यू
चौघांचा प्राण घेणाऱ्या या भीषण अपघाताची तीव्रता दर्शवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एमजी विंडसर एव्ही कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली दिसत आहे. विजयवाडा येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगला किंवा दुभाजकाला धडकली. या धडकेमुळे कारला आग लागली आणि भडका उडाला. ही आग क्षणात कारच्या सर्व बाजूने पसरली. गाडीतील चार प्रवासी आतच अडकले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, असं पोलिसांनी सांगितलं.
Four people, including a three-year-old child, were charred to death after the electric vehicle (EV) they were travelling in caught fire after hitting a road divider in Andhra Pradesh on Monday. https://t.co/u4R3NN8vIT
— Pune Pulse (@pulse_pune) October 14, 2026
कशामुळे झाला अपघात?
पाचवा प्रवासी गंभीर जखमी झाला असून. स्थानिक नागरिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयासाठी नेण्यासाठी स्थानिकांनी मदत केली. डॉक्टरांच्या हवाल्याने पोलिसांनी सांगितले की, जखमी व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे.अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली, तर पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, अतिवेगामुळे हा अपघात झाला असावा, असे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास अधिकारी धडक आणि त्यानंतर लागलेली आग यांमागील घटनाक्रमाची पडताळणी करत आहेत.
मागच्या महिन्यातही झालेला असाच अपघात
गेल्या महिन्यातच आसाममधील नागाव जिल्ह्यातील 'पुराणी गुदाम' येथील 'केनापत्ती' भागात एका रस्ते अपघातात दोन जण अशाच विचित्र अपघातात ठार झाले होते. तर याच कारमधील अन्य दोन जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातामध्ये किया कॅरेन्स कार एका स्ट्रीट लाईटच्या खांबाला धडकल्यानंतर तिला आग लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वजण कारमधून अरुणाचल प्रदेशाकडून गुवाहाटीच्या दिशेने जात होते. त्यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार आधी डिवायडरला धडकली आणि त्यानंतर ती उलटून स्ट्रीट लाईटच्या खांबावर आदळली. या धडकेनंतर कारला भीषण आग लागली. कारमध्ये एकूण चार जण होते. त्यापैकी दोघे जण आत अडकले होते आणि गंभीररीत्या भाजल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. इतर दोघांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर गुवाहाटीमध्ये उपचार सुरु आहेत.