खोट्या सह्या, 'ती' वही अन् व्हॉट्सअप मेसेज... शिंदेंनी सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंविरुद्धातील युक्तिवादात मांडलेले 7 मुद्दे कोणते? आज पुन्हा सुनावणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बाजू मांडणारे वकील ध्रुव मेहता या प्रकरणात आपला कालचा युक्तीवाद आजही सुरू ठेवतील. आज महेतांकडून आमदार अपात्रतेसंदर्भात युक्तिवाद केला जाईल. मात्र काल त्यांनी कोणते मुद्दे मांडले आणि ते काय म्हणाले हे पाहूयात...
आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सलग दुसऱ्या दिवशी शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी होणार आहे. आज दुपारी दोन वाजता सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बाजू मांडणारे वकील ध्रुव मेहता या प्रकरणात आपला कालचा युक्तीवाद आजही सुरू ठेवतील. आज महेतांकडून आमदार अपात्रतेसंदर्भात युक्तिवाद केला जाईल. मेहता यांनी आपली बाजू मांडण्यासाठी आणखी दोन तास लागतील असं सांगितलं आहे. ध्रुव मेहता आज कोणते मुद्दे मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, कालच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकं काय झाले? ध्रुव मेहतांनी कोर्टात युक्तिवादामध्ये काय म्हटलं पाहूयात सात मुद्द्यांच्या आधारे...
1. पक्षांतर्गत मतभेद म्हणजे पक्षांतर नव्हे
ध्रुव मेहता यांनी दहाव्या अनुसूचीचा संदर्भ देत पक्षांतर्गत मतभेद आणि पक्षांतर या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचं सांगितलं. लोकशाहीत पक्षांतर्गत असहमतीला पक्षांतर मानता येणार नाही. दहाव्या अनुसूचीचा उद्देश पक्षांतर रोखणं आहे, मतभेद दडपणं नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.
2. बैठकीला गैरहजर राहणं म्हणजे पक्ष सोडणं नाही
21 आणि 22 जूनच्या बैठकींना आमदार गैरहजर राहिले, या मुद्द्यावर मेहता यांनी आक्षेप घेतला. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याने राजकीय पक्षाचं सदस्यत्व कसं संपुष्टात येऊ शकतं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
3. उपस्थिती नोंदवहीतील दोन स्वाक्षऱ्या बनावट असल्याचा आरोप
आमदारांच्या उपस्थितीबाबत सादर करण्यात आलेल्या नोंदवहीवर मेहता यांनी गंभीर आक्षेप घेतला. उपस्थिती पत्रकात 14 जण उपस्थित असल्याचं दाखवलं आहे. मात्र, मूळ कागदपत्रात 16 स्वाक्षऱ्या आहेत. दोन स्वाक्षऱ्या नंतर घालण्यात आल्याचा आणि त्या बनावट असल्याचा आरोप त्यांनी केला.
4. सरन्यायाधीशांनी उपस्थिती नोंदवहीवर सवाल केला
उपस्थिती नोंदवहीत आमदारांच्या स्वाक्षऱ्या दिसत असताना ते बैठकीला उपस्थित नव्हते, असं कसं म्हणता येईल, असा सवाल सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी उपस्थित केला. यावर मेहता यांनी सभापतींनी उपस्थिती पत्रक अविश्वसनीय ठरवल्याचा संदर्भ दिला.
5. व्हीप बजावल्याचा पुरावा कुठे?
आमदारांना व्हीप बजावल्याचा ठोस पुरावा नसल्याचा मुद्दा मेहता यांनी मांडला. 21 जूनच्या बैठकीसाठी पाठवलेल्या पत्रात बैठकीचा अजेंडा नव्हता. तसेच एकनाथ शिंदे यांना पाठवलेला व्हॉट्सॲप संदेश बैठकीच्या वेळेनंतर पोहोचल्याचा दावाही त्यांनी केला.
6. शिंदेंना गटनेतेपदावरून हटवण्याचा ठराव झाला होता का?
21 जून रोजी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्याचा कोणताही ठराव मंजूर झाला नव्हता, असा दावा मेहता यांनी केला. साक्षीदारांच्या उलटतपासणीतून ही बाब स्पष्ट झाल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं.
7. जुन्या न्यायालयीन निकालांचा आधार
ध्रुव मेहता यांनी किहोटो होलोहन आणि राजेंद्र सिंह राणा प्रकरणातील निकालांचा संदर्भ दिला. केवळ अपात्रतेची याचिका दाखल झाली म्हणून आमदार अपात्र ठरत नाहीत. आरोप पुराव्यांच्या आधारे सिद्ध होणं आवश्यक आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.